लवकरच उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश; बीडमध्ये चर्चेला उधाण
एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बीड शहरातील नेते शेख निजाम हे आगामी राजकारणाचा वेध घेत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेवून येणार्या नगरपालिका निवडणूकीमध्ये नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. येत्या काही दिवसातच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेशही करणार असून त्याची प्राथमिक फेरी झाली असल्याचेही सांगितले जात आहे. शेख निजाम यांच्या शिवसेना प्रवेशाची बीडमध्ये जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे शहरातील काकडहिरा भागात होत असलेल्या मुस्लिम समाजाच्या इज्तेमात देखील हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये राजकारणात कधी काय होईल? हे सांगता येत नाही. तसे सार्वत्रिकच राजकारण आता अस्थिर झाले आहे. कोण कुठे जाईल? याचा पत्ता लागत नाही. राजकारणात आचार आणि विचार, निष्ठा आणि विश्वास या गोष्टी कायमच्या संपल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर उध्दव ठाकरे यांनी सरकार स्थापन केल्यानंतर मुंबईमध्ये रझा अकादमीसमवेत पहिली बैठक घेतल्यानंतरच राज्यातील मुस्लिमांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अडिच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ज्या पध्दतीने काम केले त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मानणारा मुस्लिम समाज उध्दव ठाकरेंच्या पाठीशी अपसुकच गेला. हे काँग्रेसलाही कळाले नाही आणि राष्ट्रवादीलाही उमगले नाही. विद्यमान परिस्थितीमध्ये मुस्लिम युवकांमध्ये उध्व ठाकरेंची सेक्युलर प्रतिमा झाली असून मुस्लिम समाजातून उध्दव ठाकरेंना मोठी सहानूभूती मिळत आहे. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या मुस्लिम समाजात उध्दव ठाकरेंना मोठा मान दिला जात आहे. त्यामुळे आगामी राजकारणाची नांदी ही उध्दव ठाकरे यांच्या बाजूनेच असणार असल्याचे गृहीत धरून शेख निजामसारखे मुस्लिम तरूण शिवसेनेकडे आकर्षीत होत आहेत. नगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी कायम राहिली तर बीडची जागा शिवसेनेला सोडून घेतली जाईल कारण विधानसभेची जागा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे नगरपालिका शिवसेनेला सुटू शकते. अशी चर्चा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांमध्ये कायम चालू असते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी सातत्याने चांगले युवक शिवसेनेत कसे येतील? यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांनीच शेख निजाम यांच्या बाबतीत पुढाकार घेतल्याचेही बोलले जात आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ऐनवेळी कळेलच असे उत्तर दिले गेले. याचाच अर्थ एमआयएममध्ये मोठी फूट पडणार असून शेख निजामसारखा कार्यकर्ता आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेवून नगरपालिकेच्या रणांगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा शहरातील मुस्लिम बहूलभागामध्ये सातत्याने होत आहे.
गत नगरपालिकेत निसटता पराभव
फारूक पटेल ठाकरेंच्या सेनेतच
मुस्लिम समाजातील दुसरे बहुचर्चित नेते फारूक पटेल हे सध्या माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटात आहेत. मार्च 2022 मध्ये ते राष्ट्रवादीमधून उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जयदत्त क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली आणि माजी खा.चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत दाखल झाले होते. आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेपासून फारकत घेतली आहे. त्यामुळे माजी नगराध्यक्ष तथा मुस्लिम समाजातील नेते फारूक पटेल हे देखील शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छूक असल्याची चर्चा अधुन मधून चालू आहे. जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांबरोबर त्यांच्या चर्चेच्या एक दोन फेर्याही झाल्या आहेत. त्यामुळे फारूक पटेल देखील आगामी नगरपालिकेमध्ये उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाचे दावेदार होवू शकतात. असेही बोलले जात आहे.
Leave a comment