कार,पिकअपसह दोन ठिकाणी दुचाकी चोरी
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात चोरी,घरफोड्यांची मालिका सुरु असताना आता वाहनचोरही सक्रीय झाले आहेत. आष्टी तालुक्यात कडा-धामणगाव रस्त्यावरुन पिकअप वाहन चोरी झाले. तर अंबाजोगाई ग्रामीण ठाणे हद्दीत चोरट्यांनी कार चोरुन नेली.याशिवाय दुचाकी चोर्यांचे गुन्हे तर नित्याचे झाले आहेत. परळी शहर हद्दीत दोन गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे वाहन चोरांची टोळीच सक्रीय झाली आहे असे चित्र दिसून येत आहे. पोलीसांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून वाहनचोरांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. वाहन चोरीच्या केवळ तक्रारी दाखल होतात, तपास लागतच नाही अशी स्थिती आहे.
यश मनोज गुगळे (रा.कडा,ता.आष्टी) हे व्यापारी आहेत. दि.21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान त्यांनी त्यांचे पिकअप वाहन क्र.(एम.एच.06 एजी 1760) हे कडा-धामणगाव रस्त्यावर यशोदिप मशिनरी या दुकानासमोर उभे केले होते. 2 लाख 10 हजार रुपये किमतीचे हे पिकअप चोरी झाले. आष्टी ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा नोंद झाला. दुसरी घटना अंबाजोगाई ग्रामीण ठाणे हद्दीत घडली. अंबासाखर येथे विशाल शिवाजी घाडगे (रा.सेलुअंबा,ता.अंबाजोगाई) यांची 3 लाख रुपये किमतीची इनेव्हा कंपनीची कार क्र(एम.एच.43 आर.0692) चोरट्यांनी लंपास केली.
दरम्यान 25 नोव्हेंबर रोजी परळी शहर ठाण्यात दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले. या घटना 22 जुलै 2022 रोजी घडलेल्या, मात्र गुन्हे आता दाखल झाले. यात विठ्ठल बाबुराव गुट्टे (रा.कासारवाडी, ता.परळी) यांची 20 हजारांची दुचाकी क्र.(एम.एच.44 एफ 8955) चोरट्याने लांबवली. दुसर्या घटनेत काशिनाथ रमेश गवते (रा.भोईगल्ली,परळी) यांची 20 हजारांची दुचाकी क्र.(एम.एच.25 व्ही.4707) चोरट्याने भोई गल्लीतील गणपती मंदिरासमोरुन चोरुन नेली.
Leave a comment