बीडमध्ये डीएचओ म्हणून काम केलेले डॉ.आर.बी.पवार, नांदूरघाटच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.महानंदा जायभाये आरोग्य उपसंचालकपदी,
डॉ.अशोक हुबेकर कोल्हापूरचे सीएस, डॉ.महादेव चिंचोले धुळ्याचे तर बोधेगाव येथील डॉ.मनोहर बनसोडे यांना उल्हासनगरला सीएस म्हणून पदस्थापना
बीड । वार्ताहर
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सहसंचालक तसेच उपसंचालक आणि जिल्हा शल्यचिकित्सक या संवर्गातील बदल्यांची प्रक्रिया आज दि.11 नोव्हेंबर रोजी पूर्ण केली आहे. यामध्ये बीड जिल्हा आरोग्य विभागात यशस्वीरित्या काम करणार्या डॉक्टर मंडळींना मानाच्या आणि महत्वाच्या पदावर स्थान देण्यात आले आहे.
बीडमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम केलेले आणि सध्या सातारा येथे डीएचओ डीएचओ म्हणून कार्यरत असलेले डॉ.आर.बी.पवार यांची पुणे आरोग्य सेवा मंडळाच्या उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील नांदुरघाट येथील ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.महानंदा जायभाये यांची औरंगाबाद मंडळाच्या आरोग्य उपसंचालकपदी नियुक्ती झाली आहे. या बरोबरच बीड जिल्हा रूग्णालयातील रूग्णालयीन प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक हुबेकर यांची कोल्हापूर जिल्हा रूग्णालयाच्या शल्यचिकित्सकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सध्या गेवराई उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ.महादेव चिंचोले यांची धुळे जिल्हा रूग्णालयाच्या शल्यचिकित्सकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच परळी तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ.मनोहर बनसोडे यांनाही उल्हासनगर येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदस्थापना मिळाली आहे.
उपसंचालक म्हणून पदस्थापना मिळालेले डॉ.आर.बी. पवार हे सामान्य कुटूंबातील आहेत.बीडसह उस्मानाबाद, नंदूरबार आणि सातारा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. त्यानंतर मुंबई येथे सहायक संचालक म्हणूनही काम केले. तसेच डॉ.अशोक हुबेकर यांनी रायमोहा ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे.त्यानंतर जिल्हा प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून डॉक्टर, कर्मचार्यांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले आहे. याशिवाय डॉ.महादेव चिंचाळे हे मॅग्मो संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. सध्या ते गेवराई उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक आहेत.त्यांनाही प्रशासनाचा तगडा अनुभव आहे.
बीड जिल्ह्यात आरोग्य विभागात यशस्वीपणे कामकाज करणार्या डॉक्टर मंडळींना राज्याच्या आरोग्य विभागात मानाचे स्थान मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.दरम्यान आज सकाळी जिल्हा रूग्णालयात शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्या हस्ते डॉ.अशोक हुबेकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ.सचिन आंधळकर व इतर डॉक्टर उपस्थित होते.
Leave a comment