जिल्हा रुग्णालय परिसरात गुटखा शौकिनांवर होणार कारवाई
बीड । वार्ताहर
जिल्हा रुग्णालय परिसरात गुटखा,तंबाखू खावून फिरणार्यांची संख्या कमी नाही. या सेवनाने कर्करोग होतो हे माहिती असतानाही शौकिनांची सवय काही तुटत नाही. दुसरीकडे रुग्णालय परिसरात गुटखा विक्री करू नका अशा सूचना वारंवार पानटपरी चालकांना देऊनही गुटखा विक्री सुरूच असते. हाच धागा पकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांनी स्वत: टपरीवर जावून तेथील गुटखा जप्त केला. 25 ऑक्टोबर रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ. शहाणे व इतर कर्मचार्यांनीही जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरातील पानटपर्यांची तपासणी केली. यावेळी एका टपरीमध्ये गुटखा आढळला असून तो जप्त करण्यात आला. दरम्यान रुग्णालय परिसरात गुटखा खाऊन पिचकारी मारणार्यांवरही आता ऑन द स्पॉट कारवाई केली जाणार असल्याचा इशारा डॉ.सुरेश साबळे यांनी दिला.
बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आणि इमारतीच्या आतमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. वारंवार स्वच्छता करूनही काही लोक गुटखा, तंबाखू , पान खाऊन रुग्णालयाच्या भिंतीवर पिचकारी मारतात, त्यामुळे चांगल्या भिंती खराब होऊ लागले आहेत. अस्वच्छतेचा परिणाम तेथील रुग्णांवर होतो. त्या अनुषंगाने सिव्हिल सर्जन सुरेश साबळे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील सर्व टपरीवाल्यांना गुटखा विकू नका अशा सूचना दिल्या होत्या. वारंवार सूचना देऊनही गुटखा विक्री सुरूच असल्यामुळे परिसरात सर्वत्र अस्वच्छता होत होती. त्या पार्श्वभूमीवर सी.एस.सुरेश साबळे यांनी 25 रोजी सकाळी जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील टपर्यांची तपासणी केली. एका टपरीमध्ये गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्याने ते जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जप्त केलेल्या गुटख्याची आज होळी
बीडचा शासकीय रुग्णालय परिसर तंबाखूमुक्त व्हावा यासाठी आरोग्य प्रशासन काम करत आहे. मंगळवारी रुग्णालय परिसरातील पानटपर्यातून जप्त केलेल्या गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थाची आज होळी करण्यात येणार आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर तंबाखूमुक्त परिसर संकल्प करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी सांगीतले. तसेच यापुढे जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a comment