■बीड जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा दिवस जवळ आला
■२३ सप्टेंबर रोजी आष्टी-नगर रेल्वेचा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
आष्टी : रघुनाथ कर्डीले
रेल्वे हा बीड जिल्ह्यातील जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न असुन आता हळूहळू मार्गी लागला आहे हा प्रश्न मार्गी लागण्यास तब्बल पंचवीस वर्षाहून अधिक काळ गेला या काळात अनेक राजकीय आंदोलने झाली मात्र रेल्वेचे स्वप्न हे स्वप्नच राहत होते.हेच बीड जिल्ह्यातील जनतेचे रेल्वेचे स्वप्न शुक्रवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी पूर्ण होत असून नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होत असून याचा लोकार्पण सोहळा आष्टी येथे होत आहे.याप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनकुमार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे हे उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी अनेक वेळा रेल्वे उद्घाटनाचे मुहूर्त ठरले होते मात्र ऐनवेळी लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला होता.
नगर परळी रेल्वे मार्गाचे एकूण लांबी 261 किलोमीटर आहे नगर पासून आष्टी पर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे मागील सहा महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते त्यामुळे बीड जिल्ह्यातील जनतेचा शुक्रवार हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा दिन ठरणार आहे.
अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग 261 किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या 1995 साली या नगर बीड परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्तीअभावी या मार्गाचे काम रखडले. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी बीड जिल्हा वासियांना बीड रेल्वे चे स्वप्न दाखवले होते, आणि त्यांनी या रेल्वे मार्गासाठी भरभरून योगदान देत पंतप्रधान नरेंद्र मोदी कडे हट्ट धरून या मार्गासाठी निधीची तरतूद करण्यास भाग पाडले. त्याच तोडीत राज्य सरकारनेही अर्धा वाटा देत रेल्वे कामास गती देण्याचे काम केले .सद्यस्थितीत हा प्रकल्प तीन हजार कोटी च्या पुढील असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली आहे.
अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान ७ कि.मी.अंतरावर मार्च २०१८ रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती नंतर अहमदनगर - नारायणडोह - सोलापूरवाडी या १५ कि.मी. अंतरावर दि. २५ फेब्रुवारी २०१९ रोजी ७ डब्याची रेल्वे चाचणी झाली मात्र नंतर लॉकडाऊनमुळे पुढील काम मंदावले आणि आष्टीपर्यंत कधी रेल्वे चाचणी होणार हा प्रश्न ऐरणीवर आला होता त्यानंतर सोलापूर वाडी ते आष्टी 32 किमी अंतरावर 20 डिसेंबर 2021 रोजी चाचणी घेण्यात आली होती.
नगर ते आष्टी सहा थांबे
अहमदनगर ते आष्टी 67 किलोमीटर अंतर असून या दरम्यान सदरील रेल्वेगाडी सहा ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार करणार आहे यामध्ये प्रथम नारायणडोह,लोणी ,सोलापूर वाडी, धानोरा, कडा व आष्टी या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.
लवकरच तिकीट गृह सुरू होणार
आष्टी तालुक्यातील पाच व नगर जिल्ह्यातील एक स्थानकावर लवकरच तिकीट गृह सुरू आहे.त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुलभ होणार आहे.
आष्टीच्या आसपासच्या पाथर्डी जामखेड कर्जत पाटोदा शिरूर बीड इत्यादी तालुक्यातील नागरिकांना पुणे मुंबई व इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तसेच व्यापारी वर्ग यांना मुंबई पुणे दिल्ली इंदोर गुजरात सुरत इत्यादी ठिकाणाहून माल आणण्यास या रेल्वे गाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे यामुळे उद्योगधंद्यास चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.
Leave a comment