सायकल रॅली, वृक्ष लागवड, क्रिकेट स्पर्धेसह शाळा,महाविद्यालयात विविध स्पर्धा
ध्वज संहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
बीड | वार्ताहर
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून येत्या 13 ते 17 ऑगस्ट दरम्यान देशभरात हर घर झंडा हा उपक्रम राबवला जात आहे यानिमित्त बीड जिल्ह्यातील हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज दि.4 ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमातंर्गत येत्या 13 ऑगस्ट रोजी बीड ते कपिलधार अशी भव्य सायकल रॅली आयोजन तसेच बिंदुसरा धरण परिसराच्या दोन्ही बाजूने एक हजार वृक्षलागवड आणि पत्रकार, पोलीस, व इतर घटकांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हर घर तिरंगा उपक्रम राबवतांना सर्वांनी ध्वज संहितेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सोमवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती हॉलमध्ये आज आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, उपजिल्हाधिकारी (सामान्य) दयानंद जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानोबा मोकाटे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी शर्मा पुढे म्हणाले की, नागरिकांनी प्लास्टीकचा झेंडा वापरु नये. झेंड्याच्या किमती निश्चित केल्या जात आहेत.जिल्ह्यात 15 ठिकाणी शासन सूचनेनुसार स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील घरे आणि आस्थापनांसाठी केंद्र सरकारकडे 5 लाख 94 हजार 667 ध्वजांची मागणी केली गेली आहे. पैकी आतापर्यंत 2 लाख ध्वज प्राप्त झाले आहेत.तसेच आणखी 3 लाख 50 हजार ध्वज उपलब्ध करून घेतले जाणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी करून रूपरेषा सांगितली. त्यानंतर उपजिल्हाधिकारी जगताप यांनी हर घर झेंडा उपक्रमाबाबत प्रशासनाने केलेल्या कामाचा आढावा पत्रकारांसमोर मांडला. ते म्हणाले, जिल्ह्यात 70 हजार तिरंगा झेंडे उपलब्ध झाले आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात हर घर झेंडा तसेच स्वराज्य उपक्रम मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी राबवला जाणार आहे. या निमित्त सर्व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यात आली आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानोबा मोकाटे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामीण भागात प्रबोधन आणि जनजागृती झाली आहे.याबाबत सरपंच आणि ग्रामसेवकांच्या बैठका घेवून त्यांना सूचना दिल्या गेल्या आहेत. तसेच शाळांमध्ये स्वराज्य उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे.पुढील आठवड्यात हे उपक्रम संपन्न होणार आहेत. याप्रसंगी सीईओ अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात झेंडा विक्री केंद्र सुरू करण्यात येत आहेत, अमृत महोत्सव यशवसी करण्यासाठी विविध यंत्रणा काम करत आहे.प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा, पोस्टर लावून प्रबोधन केले जात आहे. केज, बीड, आष्टी येथे तिरंगा झेंडा विक्री केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले आहे. बचत गटाच्या माध्यमातून झेंडा विक्री केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलिस दलाच्या वतीने अमृत दौडचे आयोजन-एसपी नंदकुमार ठाकूर
या प्रसंगी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दि 26 जुलै ते 14 ऑगस्ट 2022 दरम्यान अमृत दोड आयोजित करण्यात आली आहे.तसेच जिल्ह्यातील 75 शाळा, महाविद्यालयांमध्ये पोलिस दलाकडून भेटी दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना सायबर, तसेच अन्य गुन्ह्याची माहिती देवून त्यांचे प्रबोधन केले जात आहे. या बरोबरच येत्या 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान पोलीस मुख्यालयात डॉगस्कॉड व शस्त्र प्रदर्शन आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी चौका-चौकात पोलिस बॅण्ड पथकाकडून राष्ट्गीत धून वाजवली जाईल.तसेच पोलीस अधिकारी, कर्मचार्यांच्या शासकीय निवासस्थानी आणि जिल्ह्यातील पोलीस सर्व ठाणे पोलीस चौकी येथे झेंडावंदन केले जाणार आहे.
Leave a comment