बोरखेडे नजीक वरवाडीत दरोडा
बीड । वार्ताहर
तालुक्यातील बोरखेड जवळ असलेल्या वडवाडी येथे काल मध्यरात्री अज्ञात 8 ते 10 दरोडेखोरांनी बळीराजा कृषि विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर यांच्या कार्यालय आणि घरी धाडसी दरोडा टाकून पती-पत्नीला मारहाण करत 9 लाख रुपये रोख आणि 5 तोळे सोने चोरून नेले. या घटनेने बालाघाटावर खळबळ उडाली असून घटनेची माहिती देताच नेकनूर व एलसीबी च्या अधिकारी, पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. डॉग स्कॉडही वडवाडीत दाखल झाले असून त्याचाही तपास पुर्ण झाला आहे. या धाडसी दरोड्यानंतर जिल्हा पोलीस दलाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत श्वानासह घटनास्थळी भेट देऊन चोरीच्या ठिकाणावरून श्वानाने माग काढला आहे.दरम्यान, या संस्था परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरटे कैद झाले असून प्रकारणाचा तपास लावण्याचे आव्हान जिल्हा पोलीस दलासमोर आहे.
बीड तालुक्यातील वडवाडी येथे अभिमान शाहूराव अवचर यांचे बळीराजा कृषि विज्ञान मंडळाचे कार्यालय असून या ठिकाणी विविध कृषि कंपन्या आहेत. याच ठिकाणी शासकीय हरभरा खरेदी करण्यात येतो. अभिमान अवचर हे पत्नी सत्वशीला अवचर यांच्यासह येथील बंगल्यात वास्तव्यास आहेत. संस्थेवर आलेल्या 8 ते 10 चोरांनी कर्मचारी आणि मॅनेजरच्या रूमला बाहेरून कड्या लावून बंगल्यात प्रवेश केला. अवचर यांच्या बेडरूमच्या दरवाजावर अवजड वस्तूने घाव घालून दरवाजा
तोडला आणि आतमध्ये प्रवेश करून अवचर पती-पत्नीला मारहाण करून पिस्तूल दाखवले. पिस्तूलमधील सहाच्या सहा गोळ्या घालू अशी धमकी देऊन अंगावरील सोने काढून घेत पैसे कोठे ठेवले आहेत म्हणून जीवे मारण्याची धमकी देवून तुझ्या वडिलांना आणि तुला जिवे मारण्याची सुपारी असल्याचे सांगत अभिमान अवचर व त्यांच्या पत्नीला बांधून ठेवले. अवचर यांच्या गळ्यातील लॉकेट, अंगठी आणि पत्नीच्या अंगावरील दागीने असे 5 तोळे सोने आणि शेतकर्यांच्या हरभरा खरेदीचे वाटप करण्यासाठी आणून ठेवलेले 9 लाख रुपये रोख, 2 मोबाईल व एक टॅब असा ऐवज घेऊन चोरांनी पोबारा केला. चोरट्यांनी मध्यरात्री 1.30 वाजेपासून 2.45 वाजेपर्यंत येथे धुडगुस घातला. यानंतर अवचर यांनी आरडाओरड केल्यानंतर आवाज ऐकून जाग्या झालेल्या एका नोकराने रूमचा दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता तो बाहेरून बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर खिडकीतून बाहेर येऊन बाजूच्या रूमचा दुसर्या नोकराचा बाहेरून बंद असलेला दरवाजा उघडून त्याला उठवले. त्यानंतर दोन्ही नोकरांनी मॅनेजरच्या रूमचा बाहेरून बंद असलेला दरवाजा उघडून त्यांना घेऊन तिघे जण बंगल्यात आले असता अभिमान अवचर यांच्या पायातून रक्त येत असल्याचे आणि पती- पत्नीला बांधून ठेवले असल्याचे त्यांनी पाहिले. नोकरांनी दोघांना सोडल्यानंतर नातेवाईकांना फोन करून माहिती दिली. सकाळी याची माहिती नेकनूर पोलिसांना दिल्यानंतर सपोनि मुस्तफा शेख यांनी पोलीस कर्मचार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचार्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. ठसे तज्ज्ञांनी भेट देवून ठसे घेतले आहेत. या धाडसी दरोड्याने बालाघाटावर जनतेतून भीती व्यक्त केली जात आहे.
Leave a comment