घाबरू नका पण सतर्कता बाळगा : शाम सिरसाट
आष्टी / रघुनाथ कर्डीले
आष्टी तालुक्यातील श्रृंगेरी देवी परिसरात आठ दिवसांपूर्वी बिबट्याने शेळीचा फडशा पाडला होता. तर बुधवारी काही ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले असून त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान,वन अधिकारी शाम सिरसाट यांनी शुक्रवारी दिवसभर पाहणी करीत या परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे मान्य केले आहे.तसेच हा बिबट्या नरभक्षक नसून लोकांनी घाबरू नये मात्र सतर्कता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
आष्टी तालुक्यातील श्रृंगेरी देवी परिसरात डोंगर असल्याने मागिल काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे. तर काही दिवसांपूर्वी शेजारील आंबेवाडी येथील शेतकऱ्याची शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली होती. दरम्यान, बुधवारी रात्री प्रवास करताना ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले. यावेळी काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.
दरम्यान, वनविभागाने पाहणी करून या भागात या परिसरात बिबट्याचे अस्तित्व असल्याचे मान्य केले आहे. मागील दोन ते तीन महिन्यात बिबट्याने मनुष्यावर हल्ल्याची कोणतीही घटना नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. लहान मुलांवरती लक्ष ठेवावं, रात्री फिरु नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शाम शिरसाठ यांनी केले आहे.
Leave a comment