तिरंगा फडकविताना सर्वांनी नियमांचे पालन करावे-जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा
बीड । वार्ताहर
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 13 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये देशभरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील तब्बल 5 लाख 72 हजार घरांमध्ये नाागरिकांनी ध्वज विकत घेवून ध्वजारोहन करावे तसेच सर्वांनी तिरंगा झेंडा फडकविताना नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले.
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाची माहिती देण्यासाठी 18 जुलै रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती हॉलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापपंचायत) ज्ञानोबा मोकाटे, उपजिल्हाधिकारी (सामान्य) दयानंद जगताप, नगर प्रशासन अधिकारी निता अंधारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, किरण वाघ यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, बीड जिल्ह्यात 5 लाख 72 हजार लोकसंख्या आहे. या ठिकाणी झेंडावंदन करण्यात येणार आहे. किमान 30 रुपयात हा ध्वज नागरिकांना खरेदी करता येणार आहे. बीड जिल्ह्यात किमान 6 लाख ध्वज लागतील, त्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी प्लास्टीकचा झेंडा वापरु नये. झेंड्याच्या किमती अद्याप निश्चित झाल्या नसून डिलर्स सोबत चर्चा केली जात आहे. झेंड्याचा अवमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सीईओ अजित पवार म्हणाले की, हर घर झेंडा संदर्भाने जिल्ह्यात येत्या 25 व 29 जुलै रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. ग्रामीण भागात दंवडी देऊन याची माहिती दिली जात आहे.यासाठी गावोगावी ग्रामसभेच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तसेच भारतीय ध्वजसंहितेचे नियमही समजावून सांगीतले जात असल्याचे ते म्हणाले. बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातील 4 लाख 72 हजार तसेच शहरी भागातील 1 लाख घरांवर ध्वजारोहण होण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून नियोजन केले गेले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली.
बीड नगरपालिका क्षेत्रात 1 लाख घरांमध्ये ध्वजारोहन होईल असे नियोजन केले जात असून यासाठी वार्ड निहाय नागरिकांना ध्वज उपलब्ध होतील यासाठी काम केले जात असल्याची माहिती नगर प्रशासन अधिकारी नीता अंधारे यांनी यावेळी दिली. हर घर तिरंगा मोहिमेत स्वतः नागरिकांनी झेंडा खरेदी करून फडकवयचा आहे. यासाठी जनजागृती केली जात आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) दयानंद जगताप यांनी दिली.
Leave a comment