अर्भक स्त्री की पुरुषाचे ? उत्तरीय तपासणीनंतर स्पष्ट होणार
ग्रामीण पोलीसांनी घेतली घटनास्थळी धाव
बीड । वार्ताहर
तालुक्यातील बक्करवाडी येथील अवैध गर्भपाताचे प्रकरण ताजे असतानाच आता तालुक्यातील हिरापूर येथील जून्या पुलालगत अंदाजे चार महिन्याचे मृत अर्भक आढळून आले. आज 10 जुलै रोजी सकाळी हा प्रकार समोर आला.ग्रामीण पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर अधिकारी,कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत अर्भक उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलवले.
हिरापूर (ता.बीड) येथील जून्या पुलागत 10 रोजी सकाळी काही जणांना मृत अर्भक आढळून आले. त्यानंतर गेवराई पोलीसांना माहिती दिली गेली, मात्र ही घटना ज्या ठिकाणी घडली ते ठिकाण बीड ग्रामीण ठाणे हद्दीत येत असल्याचे स्पष्ट झाले.नंतर गेवराई पोलीसांनी बीड ग्रामीण ठाणे निरीक्षकांना कळवले. त्यानंतर ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह अंमलदार जयसिंग वाघ, चालक कृष्णा बडे व कर्मचार्यानी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृत अर्भक उत्तरीय तपासणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान हे अर्भक अंदाजे चार महिन्याचे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे अर्भक कोणी फेकून दिले, हे आता तपासातून निष्पन्न होणार असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगीतले.
अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करणार
हिरापूर पुलालगत चार महिन्याचे एक मृत अर्भक आढळून आले.हे अर्भक पुरुष की स्त्री हे स्पष्ट झालेले नाही.आता उत्तरीय तपासणी अहवालातून ते स्पष्ट होईल.या प्रकरणात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी सांगीतले. व्हिसेरा राखून ठेवला असणार असल्याचेही ते म्हणालेे.
Leave a comment