गर्भपात करण्यापूर्वी महिलेला पुर्वी किती मुलेे,मुली? याची माहिती जाणून घेणार
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयांना सूचना
बीड । वार्ताहर
तालुक्यातील बक्करवाडी येथील अवैध गर्भपाताच्या प्रकरणात बीड जिल्हा संबंध राज्यभरात चर्चेत आला. भविष्यात अवैध गर्भपाताचे प्रकरण बीडमध्ये घडू नये. तसेच जिल्ह्यात मुलींचा घटता जन्मदर लक्षात घेता आता 12 आठवड्यावरील गर्भपातासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच गर्भपात करावयाचा आहे अशा महिलेस किती मुलेे,मुली आहेत? याची खात्री केली जाणार आहे. आरोग्य यंत्रणेने हा निर्णय घेतला आहे. याबाबतची संचिका 10 जून रोजी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आली होती.त्या संचिकेस जिल्हाधिकार्यांनी मान्यता दिली आहे. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील संबंधित शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांना सूचनाही दिल्या आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिली.
जिल्हा सल्लागार समितीची नुकतीच 9 जून रोजी बैठक पार पडली.या बैठकीत बीड जिल्ह्यातील मुलींचा घटता जन्मदर याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच अवैध गर्भपात रोखण्यासाठी खासगी रुग्णालयास देण्यात आलेल्या वैद्यकिय गर्भावस्था समाप्ती केंद्रास 12 ते 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यास ज्या रुग्णालयास परवानगी दिली आहे, अशा रुग्णालयांना 12 आठवड्यावरील गर्भपात करण्यासाठी सदर रुग्णाची तपासणी तसेच त्या महिलेचे गर्भपात करण्यासाठीचे खास कारण व तिची कौटुंबिक माहिती या सर्व बाबींची पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गर्भामध्ये व्यंग आढळले असेल किंवा गर्भपात करुन कुटुब नियोजन शस्त्रक्रिया करायची आहे अशा महिलाची सुध्दा खात्री करण्यात येणार आहे. तसेच या पुर्वीही असे निदर्शनास आले आहे की,महिला 12 आठवड्यावरील गर्भपात करून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी विनंती करतात व गर्भपात होताच पसार होतात.
जिल्ह्यात कुठेही असे प्रकार घडू नयेत म्हणून 12 आठवड्यावरील गर्भपात करुन घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांची पूर्वपरवानगी घेतल्यानंतरच 12 ते 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करण्यास मान्यता देणे योग्य वाटते अशा सुचना खासगी रुग्णालयांना द्यावात अशा आशयाची संचिका 10 जून रोजी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आली होती. जिल्हाधिकारी शर्मा यांनी खासगी रुग्णालयांना जिल्हा शल्य चिकित्सक यांची पूर्वपरवानगी घेण्यासाठी सूचना देण्याच्या संचिकेस दि.21 जून 2022 रोजी मान्यता दिली आहे.
त्याअनुषंगाने आता जिल्ह्यातील खासगी रुग्णालये तसेच शासकीय रुग्णालये आपल्या रुग्णालयातील वैद्यकिय गर्भावस्था समाप्ती केंद्रामध्ये 12 ते 20 आठवड्पर्यंत गर्भपात करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच संबंधित रुग्णालयांनी आजपासून पुढे 12 आठवड्यावरील गर्भपात (कुठल्याही कारणास्तव) करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांची पूर्वपरवानगी घेवूनच 12 आठवडयावरील गर्भपात करावेत अशाही सूचना दिल्या आहेत. याबाबत गेवराई व परळी उपजिल्हा रुग्णालय, केज ग्रामीण रुग्णालय तसेच नेकनूर व अंबाजोगाई स्त्री रुग्णालय प्रशासनाला पत्र देण्यात आले आहे.
अपत्ये किती याची खात्री करा
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाच्या अदिष्ठाता यांनाही सूचना दिल्या आहेत. 12 आठवड्यावरील गर्भपात करताना सदरील स्त्री रुग्णास खरोखरच मुलगा/मुलगी किंवा किती अपत्ये आहेत याची खात्री करण्यासाठी जन्माचा दाखला हस्तगत करावा.खात्री करुनच पुढील उपचारासाठी परवानगी द्यावी.आपल्या अधिनस्त विभागातही तसे आदेश द्यावेत असे नमुद केले आहे.
Leave a comment