मुंबई | वार्ताहर
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे पाचही आमदार निवडून आल्यानंतर आता महाराष्ट्रात राजकीय भूकंप पहावयास मिळत आहे.यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यासोबत अन्य 11 आमदारही असल्याची माहिती आहे. दरम्यान दुपारी दोन वाजता मंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत.
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांच्या घोषणेपासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही भाजपनं आपली जादू दाखवत महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का दिला आहे. अशातच आता महाविकास आघाडीतील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर आता शिवसेनेत फूट पडणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. कारणंही तसंच आहे, शिवसेनेतील प्रबळ नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गटातील आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडणार असल्याच्या शक्यतांनी जोर धरला आहे.
शिवसेना नेते शिवसेनेला जोरदार धक्का देणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात होत आहे. अशातच नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट नॉट रिचेबल आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे, काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची मिळत आहे. एकनाथ शिंदे असलेल्या हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Leave a comment