जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 97.20 टक्के
निकालात मुलींची बाजी, 98.20 टक्के मुली उत्तीर्ण
बीड । वार्ताहर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल 17 जून रोजी दुपारी 1 वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत बीड जिल्हा औरंगाबाद विभागात सर्वप्रथम ठरला. बीड जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 97.20 टक्के इतका लागला आहे. या पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल 97.1 टक्के तर जालना जिल्हा 95.44 टक्के, परभणी जिल्हा 95.37 टक्के आणि हिंगोली जिल्ह्याचा निकाल 94.77 टक्के इतका लागला आहे. औरंगाबाद विभागाचा एकुण निकाल 96.33 इतका लागला आहे.
मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी बीड जिल्ह्यातून 23 हजार 724 मुले आणि 17 हजार 184 मुली अशा एकूण 40 हजार 908 विद्यार्थ्यांनी बोर्डाकडे अर्ज केले होते. यापैकी 23 हजार 422 मुले तर 16 हजार 909 मुली अशा एकूण 40 हजार 331 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात दहावीची परीक्षा दिली. यापैकी 22 हजार 629 मुले, तर 16 हजार 575 मुली असे एकूण 39 हजार 204 विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.61 तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त म्हणजेच 98.02 इतकी आहे. त्यामुळे यंदाही मुलांच्या तुलनेत मुलीच हुशार असल्याचे दिसून आले आहे. बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्याचा सर्वाधिक 97.84 टक्के इतका निकाल लागला आहे. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हती. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती.ती शुक्रवारी पूर्ण झाली.
280 शाळांचा निकाल 100 टक्के
बीड जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थी संख्या वाढीस लागली आहे. यंदाच्या परीक्षेत अनेक शाळांनी नावलौकिक वाढणारा निकाल मिळवला आहे. जिल्ह्यातील तब्बल 280 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.अन्य शाळांचाही 90 टक्क्यापेक्षा अधिक निकाल लागल्याने समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात यंदा 40 हजार 331 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात दहावीची परीक्षा दिली. यापैकी 39 हजार 204 विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
पुर्नरपरिक्षार्थींचा निकाल 72.96 टक्के
दरम्यान मार्च 2022 मध्ये दहावीच्या पुर्नरपरिक्षार्थींसाठीही परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये बीड जिल्ह्याचा निकाल 72.96 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 1076 मुले व 410 मुली अशा एकूण 1486 मुला-मुलींनी अर्ज केले होते. पैकी 1036 मुले व 403 मुली एकूण 1439 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. यात 784 मुले व 266 मुली असे एकूण 1050 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलींपेक्षा सर्वाधिक म्हणजेच 75.67 टक्के तर मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 66 टक्के इतकी आहे.
राज्याचा निकाल 96.94 टक्के
दरम्यान यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणार्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणार्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. राज्यात 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 15 लाख 21 हजार 003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागात सर्वाधिक 99.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, सर्वाधिक कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल 95.90 टक्के इतका लागला असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाच्यावतीने देण्यात आली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली.
Leave a comment