बीड | वार्ताहर

 

तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील बक्करवाडी येथे शितल गाडे या महिलेचा अवैध गर्भपातामुळे मृत्यू झाला होता. या प्रकरणात फरार असलेला आरोपी सतीश बाळू सोनवणे (रा.औरंगाबाद) यास अहमदनगर येथून बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  ताब्यात घेतले. तो शिकाऊ डॉक्टर आहे.  सोनवणे हा एका गर्भलिंग निदान करण्यासाठी 10 हजार रुपये प्रत्येकी घेत होता.नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज 12 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

 

 

५ जून रोजी बक्करवाडी (ता. बीड) येथील शितल गाडे ही 30 वर्षीय महिला दगावलेल्या अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तिचा अवैध गर्भपात  झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हयात खळबळ माजली होती. या सर्व प्रकरणातील एक फरार आरोपी पकडल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी अपर अधीक्षक सुनील लांजेवार, पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांची उपस्थिती होती. 

 

 

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले, फरार आरोपीचा शोध 8 जून पासून सुरू होता. याकामी पोलिसांच्या वेगवेगळ्या 4 ते 5 टीम वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवत होत्या; मात्र आरोपीने त्याचा मोबाइल बंद ठेवल्याने तपासात अडचण येत होती, पण पोलिसांच्या टीमने त्यास अहमदनगर येथुन ताब्यात घेतले. संबंधित आरोपी सतीश हा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करत असून त्याने शीतल गाडे या महिलेचे गर्भलिंग निदान केल्याची कबुली दिली आहे. हा आरोपी औरंगाबाद येथून नगर या ठिकाणी आल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास अटक केली. शिकाऊ डॉक्टर सोनवणे हा एका गर्भलिंग निदान करण्यासाठी दहा हजार रुपये प्रत्येकी घेत असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी दिली.तसेच सतीश सोनवणे हा यापूर्वी जालना जिल्ह्यातील गवारे नामक डॉक्टरचा सहकारी म्हणून काम करत होता. तसेच अंगणवाडी सेविका मनीषा सानप ही सोनवणेला फोनद्वारे माहिती देऊन बोलावून घ्यायची आणि सानपच्या घरी गर्भलिंग निदान केले जायचे अशी माहिती तपासात समोर आली आहे. अजूनही काही माहिती चौकशीतून समोर येईल असे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

 

दरम्यान अवैध गर्भपाताच्या या प्रकरणात पिंपळनेर ठाण्याचे उपनिरीक्षक महादेव ढाकणे यांच्या फिर्यादीवरुन मयत महिलेचा पती गणेश सुंदरराव गाडे, सासरा सुंदरराव बाबुराव गाडे (दोघे रा. बकरवाडी, ता. बीड), भाऊ नारायण अशोक निंबाळकर (रा. शृंगारवाडी, ता. माजलगाव), अंगणवाडी सेविका मनीषा शिवाजी सानप (रा.अर्धमसला, ता. गेवराई), प्रयोगशाळा तंत्रज्ञ वासुदेव नवनाथ गायके (रा. आदर्शनगर, बीड), सीमा सुरेश डोंगरे यांच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. त्यातील सीमा डोंगरे या महिलेने बीड तालुक्यातील पाली येथील तलावात आत्महत्या केली. इतर पाचही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मनीषा कारागृहात आहे, तर इतरांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.