बीड | वार्ताहर
शहरात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ एक गावठी पिस्टल आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. आज ८ जून रोजी सकाळी ही घटना समोर आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
शिवाजीनगर पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय कोंडीराम भांडवले (२०,रा.बार्शी नाका, तेलगाव रोड, बीड) असे मयताचे नाव आहे. तो शहरातील एका ऑइल मिलमध्ये काम करायचा. ७ जून रोजी रात्री तो घरी पोहोचला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी रात्री साडेआठ वाजता संपर्क केला. यावेळी घरी यायला किती वेळ आहे, असे आईने विचारले असता, घराकडे येत आहे, असे त्याने सांगितले. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. रात्री ११ वाजेनंतर तो फोनही घेईना, त्यामुळे कुटुंबीयांनी मित्रपरिवार, ऑइल मिल व नातेवाईकांकडे चौकशी केली, पण त्याचा शोध लागला नाही. बुधवारी सकाळी सात वाजता स्वराज्यनगरातील रिकाम्या भूखंडातील दाट झाडीत त्याचा मृतदेह आढळून आला. शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि.केतन राठोड, सहायक निरीक्षक मनोजकुमार लोंढे, पो.ना.रवि आघाव, गणेश परजणे, विठ्ठल शिंदे, भगवान घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान, त्याच्या डोक्याला दोन्ही बाजूंनी छिद्र आहे. त्यामुळे खून की आत्महत्या, याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.घटनास्थळी अक्षय भांडवले याची दुचाकी आढळली.नंबरप्लेटवर ऑनलाइन मागविलेल्या पार्सलच्या नावाची पट्टी डकवलेली होती. त्यावरील नावावरुन ओळख पटली. तेथे एक गावठी पिस्तूल मिळून आली. ती जप्त केली आहे.
Leave a comment