नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्ह्यात एकूण 12 आरोग्य पथके
बीड | वार्ताहर
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांच्या नियंत्रणाकरिता जिल्हा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, बीड या ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.याशिवाय, जिल्हा स्तरावर साथरोग संबंधित सर्व तज्ज्ञांचे शीघ्र प्रतिसाद पथक तयार करण्यात आलेले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जे. जे. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.तसेच, जिल्हा स्तरावर एक आणि 11 तालुक्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 12 आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत.
साथीच्या रोगांमध्ये करावयाच्या तपासण्यासंदर्भातील 1 जिल्हा प्राधान्य प्रयोग प्रयोगशाळा, 2 जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, जिल्हा रुग्णालय परिसर बीड या अद्ययावत ठेवण्यात आलेल्या आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये साथरोग नियंत्रणासाठी लागणारा औषधी साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे. पावसाळ्यात साचलेले दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतात मिसळून किंवा झिरपून पाणी दूषित होते. हे पाणी दूषित होऊ नये म्हणून जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा, 5 नगर पंचायती आणि 1031 ग्रामपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वीचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले आहे.
असे आहेत क्रमांक
नियंत्रण कक्षातील मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. डॉ. पी. के. पिंगळे - 9422647483, एस. डब्लू. मांडवे - 8857915102, साजीद शेख -9421440788
बीड तहसील कार्यालयातही नियंत्रण कक्ष
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बीड तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याचा दूरध्वनी क्रमांक 02442-222902 असा आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण बीड यांचे आदेशानुसार हा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. तरी बीड तालुक्यातील नागरिकांनी आवश्यकता भासल्यास आपत्कालिन परिस्थितीमध्ये नियंत्रण कक्षातील दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार तथा अध्यक्ष, बीड तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बीड यांनी केले आहे.जून महिन्यात मोसमी पावसाला सुरुवात होऊन, अनेकदा वादळे, अतिवृष्टी, पूर, वीज पडणे, दरडी कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेवून आपत्तीत होणारी जीवित व वित्त हानी याची माहिती वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी, निर्माण झालेली परिस्थिती, घडलेल्या घटना तात्काळ संकलित करण्यासाठी हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
Leave a comment