पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हीसीव्दारे उपस्थिती
बीड । वार्ताहर
केद्रांत नरेंद्र मोदी सरकारला 8 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, भारतातील सर्व जिल्ह्यात एकाचवेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सर्व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सोमवारी सर्व अनाथ बालकांच्या उपस्थितीत सकाळी 9.45 ते 11.1पर्यंत सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या समग्र कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील एकूण 15 लाभार्थीपैकी 14 लाभार्थी प्रत्यक्षात उपस्थित राहिले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने बीड जिल्हाधिकारी यांच्या हस्ते,बीड पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जमा करून ,त्याची नोंद असलेले पासबुक प्रदान करण्यात आले. सदरील रक्कम 18 वर्ष पूर्ण झाल्यावर व्याज सह 10 लाख रुपये मिळतील या अनुषंगाने केंद्र सरकारने जमा केली आहे.
कोविड-19 महामारीमुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक-कायदेशीर पालक-दत्तक पालक यांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना काळजी व संरक्षण करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फॉर चिल्ड्रन या योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी ही मदत वितरित केली गेली. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र, जिल्हाधिकारी यांच्यातर्फे दुसरे एक प्रशस्तीपत्र, आयुष्यमान योजनेचा 5 लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा संरक्षण कार्ड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. मिळालेली रक्कम 23 वर्षापर्यंत काढता येणार नाही.पण त्यावरील व्यज 18 वर्षानंतर प्रत्येक महिन्याला काढून घेता येईल. 100000 रुपये बालकांच्या वयाची 23 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय काढता येणार नाही असे सदरील योजनेचे स्वरूप आहे.उच्च शिक्षणासाठी बँकेचे कर्ज घेतले तर त्याचे व्याज पीएम केअरमधून सरकार भरणार आहे.18 वर्षनंतर दरमहा 4 हजार रुपये शिष्यवृत्ती जो पर्यंत मुलगा/मुलगी शिकत आहे तोपर्यंत मिळणार आहे. यासह अनेक लाभ मिळणार आहेत.
अत्यंत पारदर्शक योजनेच्या माध्यमातून, माझ्या जिल्ह्यातील 15 उपेक्षित, वंचित, अनाथ लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे 1.5 कोटी रुपये मिळाले आहेत अशी प्रतिक्रिया बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमास जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, बाल कल्याण समिती अध्यक्ष डॉ.अभय वनवे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.आर.तडवी, तत्वशील कांबळे, सुनील बाळवंते,एस एस निर्मल, सय्यद सर,बाल न्यायमंडळाच्या कुलकर्णी मॅडम,डॉ राजेंद्र बंड, समुपदेशक खुपकर, अधीक्षक नितीन ताजनपुरे इत्यादी उपस्थित होते.
Leave a comment