बीड । वार्ताहर
जिल्हा रुग्णालयात येणार्या अतिगंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य व्हावे आणि त्यांना ऑक्सीजनसह व्हेंटीलेटरची सुविधाही कमी पडू नये यासाठी स्वतंत्र अतिदक्षता कक्ष कार्यान्वीत आहे, मात्र ही दोन मजली इमारतही रुग्णांसाठी अपुरी पडू लागल्याचे लक्षात येताच सोमवारपासून (दि.30) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक 6 मध्ये स्वतंत्र 12 आयसीयु बेड कार्यान्वीत केले आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना तातडीने आयसीयु बेड उपलब्ध झाले आहेत.
जिल्हा रुग्णालयाचा पदभार हाती घेतल्यापासून रुग्णांच्या उपचारासाठी समस्या येवू नयेत यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी रुग्णालय प्रशासनाच्या वारंवार बैठका घेतल्या. त्यानंतर आता आयसीयु बेडची संख्या वाढवण्यासाठी डॉ.साबळे यांनी पुढाकार घेतला. सोमवारी दुपारी रुग्णालयीन यंत्रणेला सूचना करत वार्ड क्रमांक 6 मध्ये स्वतंत्र 12 आयसीयु बेड कार्यान्वीत केले. मॉनीटरसह सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्याने अतिदक्षता कक्षात बेड न मिळणार्या रुग्णांना आता वार्ड क्र.6 मधील बेडचा आधार मिळणार आहे.
Leave a comment