स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
बीड | वार्ताहर
गावठी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या नगर जिल्ह्यातील तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि.२९) आष्टी तालुक्यात अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत गजाआड केले. त्याच्याकडून एका गावठी पिस्टलसह ३ जीवंत काडतुस जप्त करण्यात आले.
अंभोरा ठाणे हद्दीत धामणगाव- पाथर्डी रोडवरील एका बंद असलेल्या हॉटेलसमोर नगर जिल्ह्यातील एक तरुण गावठी पिस्टलची एकाला विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिस निरीक्षक सतिश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय तुपे, कर्मचारी कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, गणेश हंगे, नसीर शेख, संपत तांदळे यांनी रविवारी दुपारी माहिती मिळालेल्या ठिकाणी सापळा लावला. संशयित तरुण दीपक विष्णू मुंगसे (२१, रा. देडगाव ता. नेवासा जि.नगर) हा तिथे येताच त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व ३ जीवंत काडतुसे मिळून आली. या प्रकरणात त्याच्या विरोधात अंभोरा पोलिसांत शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
Leave a comment