आरोपी निघाले रेकॉर्डवरील गुन्हेगार;केजमधील दोन्ही गुन्हे उघड
बीड । वार्ताहर
मध्यरात्री ते पहाटे महामार्गावर जॅक ठेवायचा. तो घेण्यासाठी वाहन चालक वाहन थांबवून खाली उतरताच त्याला घेरुन शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करायची अन् त्याच्याकडील ऐवज लुटायचा अशी पध्दत वापरत दरोडा व जबरी चोरी करणार्या दरोडखोर्यांच्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. दोन्ही गुन्ह्यांची या टोळीने कबुली दिली आहे.
सचिन शिवाजी काळे (24, पारा ता.वाशी), पापा उर्फ काळ्या उर्फ आकाश बापु शिंदे (22, रा.खोमनवाडी शिवार, ता.केज) रामा लाला शिंदे (23), दादा सरदार शिंदे (45,दोघे रा.नांदूरघाट, ता.केज) व विकास उर्फ बाबा ज्ञानोबा पवार (22,रा.चिंचोली माळी गायरान,ता,केज) यांचा आरोपीत समावेश आहे.
दरोड्याची पहिली घटना केज ठाणे हद्दीत सारणी सांगवी पाटी येथे 7 मे 2022 रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली होती. बीडहून अंबाजोगाईकडे जाणार्या कारसमोर दरोडेखारोंनी जॅक ठेवला, तो घेण्यासाठी चालकाने कार थांबवली.याचवेळी आजुबाजूला दबा धरुन बसलेले सहा ते सात दरोडेखोरांनी कारचालकासह कारमधील इतरांना मारहाण करत त्यांच्याकडी रोकड व दागिणे लंपास केली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा 23 मे 2022 रोज मांजरसुंबा-अंबाजोगाई महामार्गावरील मस्साजोग येथेही दरोडेखोरांनी हीच ‘जॅक’पध्दत वापरली होती. ट्रक चालकाला रस्त्यावर जॅक दिसताच ट्रक थांबवून तो जॅक घेण्यासाठी जाताच दबा धरलेल्या चोरट्यांनी मारहाण करत करत चालकाकडील रक्कम व दोन मोबाइल लंपास केले होते. केज ठाण्यात जबरीचा चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. नंतर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा संमातर तपास करत होती. या दरम्यान गुन्हे शाखा पथकाला गुप्त बातमीदाराकडून असे गुन्हे करणार्या आरोपीची माहिती मिळाली. नंतर संशयितांना ताब्यात घेतले,, त्यांना विश्वासात घेवून विचारपूस केली असता दोन्ही गुन्हे त्यांच्या वेगवेगळ्या साथीदारांसह केल्याची कबुली दिली.गुन्ह्यात चोरलेले मोबाइल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला.
रस्त्यावर जॅक ठेवून लुट
रात्रीच्यावेळी एकत्र यायचे. नंतर महामार्गावर जॅक ठेवायचा. तो जॅक घेण्याचा मोह न आवरल्याने चालक जॅक घेण्यासाठी वाहन थांबवून खाली उतरताच दबा धरुन बसलेले हे आरोपी चालकासह वाहनातील इतर लोकांना मारहाण, शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड अतसेच मौल्यवान वसतू व इतर साहित्य बळजबरीने लुटायचे. त्यांची गुन्हे करायची ही पध्दत असल्याचे समोर आले.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, उपनिरीक्षक संजय तुपे यांच्यासह पोलीस हवालदार मोहन क्षीरसागर, कैलास ठोंबरे, नसीर शेख, अलिम शेख, युनूस बागवान, पो.ना.अशोक दुबाले, गणेश हंगे, प्रसाद कदम, अलीम शेख, विकी सुरवसे, चालक गणेश मराडे, मुकूंद सुस्कर यांनी केली.
आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
या प्रकरणातील आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्यावर बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात यापूर्वी चोरी, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी, अशा प्रकारंचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस तपास सुरु असल्याचे गुन्हे शाखा निरीक्षक सतीश वाघ यांनी सांगीतले.
----
Leave a comment