*योजनेअंतर्गत ८२ हजार लाभार्थींना ३४ कोटींचा निधी वितरित*
बीड | वार्ताहर
जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या योजने अंतर्गत दि. 1 जानेवारी 2017 ते दि. 24 मे 2022 या कालावधीत जिल्ह्यामध्ये एकूण 82 हजार 278 लाभार्थींना 34.79 लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
केंद्र शासनाची महत्वाकांक्षी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना दि. 1 जानेवारी 2017 रोजी कार्यान्वित करण्यात आली. ही योजना ग्रामीण व शहरी भागात लागू करण्यात आली असून, या योजनेंतर्गत पहिल्यांदा ज्या मातांची प्रसूति झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा पात्र महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जिवंत अपत्यासाठी देण्यात येतो. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना बीड जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना एकूण रुपये 5000 त्यांच्या बँक खात्यावर देण्यात येतात. लाभ द्यावयाचे एकूण तीन टप्पे आहेत. पहिल्या हप्त्यांतर्गत मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून शंभर दिवसात गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात रुपये 1000 जमा करण्यात येतात. दुसऱ्या हप्त्यांतर्गत किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर लाभार्थीच्या खात्यात रुपये 2000 जमा करण्यात येतात व तिसऱ्या हप्त्यांतर्गत बाळाचे जन्म नोंद प्रमाणपत्र तसेच बाळाला 14 आठवड्यापर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्याचा दाखला मिळाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात रुपये 2000 जमा करण्यात येतात. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे.
*असा घेता येतो योजनेचा लाभ*
लाभार्थी व तिच्या पतीचे आधार कार्ड, लाभार्थीचे आधार संलग्न बॅंक खाते, गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत व शासन मान्य संस्थेत शंभर दिवसाच्या आत नोंदणी प्रमाणपत्र, शासकीय आरोग्य संस्थेत व शासनमान्य संस्थेत गरोदर तपासणी प्रमाणपत्र, बाळाचा जन्म नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण प्रमाणपत्र याव्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय संस्थेमध्ये तसेच शासनमान्य रुग्णालयात बाळंतपण झाले असल्यास मिळणारे आर्थिक सहाय्य देखील देय राहील.
*योजनेचा लाभ घ्या; आरोग्य विभागाचे आवाहन*
योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने कार्यक्षेत्रातील आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका किंवा कोणत्याही आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी केले आहे.
Leave a comment