मांजरसुंबा-नांदूरफाटा रस्त्यावरील प्रकार
नेकनूर पोलीसांना चोरट्यांचे आव्हान
नेकनूर । वार्ताहर
मांजरसुंबा ते नांदूरफाट्या दरम्यान धावत्या वाहनाची ताडपत्री फाडून पाठीमागे ठेवलेल्या दोन बॅगमधील सोन्याचे 80 हजारांचे दागिणे हातोहात लंपास केले. 20 मे रोजी पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. चालकाच्या तक्रारीवरुन चोरट्यांविरुध्द गुन्हा नोंद झाला. या चोरीचा तपास करण्याचे आव्हान नेकनूर पोलीसांसमोर असणार आहे.
महेश विष्णू लांडगे (रा.आडसुळवाडी,ता.कळंब,जि.उस्मानाबाद) यांनी याबाबत फिर्याद दिली. 20 रोजी ते त्यांचे वाहन क्र.(एम.एच.04 जे.के.0212) घेवून मांजरसुबा ते नांदूफाटामार्गे प्रवास करत होते. त्यांनी त्यांची दागिणे व इतर साहित्य असलेल्या दोन बॅग वाहनात पाठीमागे ठेवल्या होत्या. पहाटे 4 ते 5 वाजेदरम्यान धावत्या वाहनाची ताडपत्री फाडून चोरट्यांनी बॅग उघडून त्यातील 32 ग्रॅम वजनाचे पट्टी गंठण लंपास केले. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर लांडगे यांनी नेकनूर ठाणे गाठत घडला प्रकार पोलीसांसमोर कथन केला. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञातांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान यापूर्वीही केज ते मांजरसुंबा मार्गावर धावत्या वाहनातून साहित्य लंपास करण्याचे प्रकार घडलेले आहेत. नेकनूर ठाण्याचे सहायक फौजदार पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत.
------
Leave a comment