वरिष्ठांकडून बीड पोलीस अधिकार्यांचे अभिनंदन
बीड । वार्ताहर
केंद्र शासनाच्या अत्यंत महत्वाच्या ई-गव्हर्नन्स प्रकल्पाअंतर्गत एनसीआरबी अर्थात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो नवी दिल्ली यांच्याकडून सीसीटीएनएस (क्राईम अॅन्ड क्रिमिनल ट्रॅकिग नेटवर्क सिस्टिम) ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. या प्रणालीच्या वापरासंबंधाने गुन्हे अन्वेषण विभाग पुणे व्दारे केलेल्या मार्च - 2022 च्या मुल्यांकनात बीड जिल्ह्याला 242 पैकी 227 गुण प्राप्त झाल्याने बीड जिल्हा राज्यात या कामगिरीत सर्वप्रथम आला आहे.
ही उत्कृष्ट कामगिरी अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीएनएस सेल बीडचे नोंडल अंमलदार पो.ना. निलेश ठाकुर, मच्छिंद्र बीडकर, चंद्रसेन राऊत यांनी विशेष परिश्रम घेऊन केली. वेळोवेळी कामकाज अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबविली. विशेष मोहीमेला पोलीस ठाण्यांचे सीसीटीएनएस नोडल अंमलदार यांनी उत्तम प्रतिसाद देत यश मिळवून बीड पोलीस दलाच्या यशात नविन उच्चांक स्थापन केला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक एम.मल्लिकार्जुन, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सर्व अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.
सीसीटीएनएस प्रणाली अंतर्गत पोलीस ठाण्याचे सर्व कामकाज संगणकीकृत व ऑनलाईन पध्दतीने चालते.तसेच सिटीझन पोर्टलव्दारे नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ऑनलाईन तक्रारी व अर्जांचा निपटारा मुदतीत होते किंवा कसे, याबरोबरच इनव्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टिम फॉर सेक्सुएल ऑफेन्स या पोर्टलव्दारे जिल्ह्यात महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार संबधाने दाखल गुन्हयांची निर्गती मुदतीत होते किंवा कसे ? या बाबतचा आढावा सीसीटीएनएस प्रणालीव्दारे ऑनलाईन क्षणात घेतला जातो. त्यानंतर तात्काळ प्रलंबित कामकाजाबाबत संबधित पोलीस ठाण्याला सूचना देण्यात येतात.
अपर पोलीस महासंचालक व गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्या कार्यालयाकडून सीसीटीएनएस प्रणालीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या राज्यातील एकुण 53 घटकांच्या मासिक कामगिरीचे मुल्यांकन करुन उत्कृष्ट कामगिरी करणार्या घटकांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. या कामगिरीची पडताळणी करतांना सीसीटीएनएस प्रणालीमध्ये अद्ययावत केल्या जाणार्या 18 फॉर्म (नोंदणी फॉर्म,तपास व अभियोग फॉर्म), महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार संबधाने दाखल गुन्हयांची मुदतित निर्गती केलेल्या गुन्हयांचे प्रमाण, सिटीझन पोर्टलवर नागरीकांकडून ऑनलाईन प्राप्त अर्ज-तक्रारीची मुदतित निर्गती, दैनंदिन दाखल गुन्हयांचे एफआयआर सिटीझन पोर्टलवर प्रकाशित करणे, सीसीटीएनएस प्रणाली मधील उपलब्ध डिजिटल अभिलेखाचा वापर करुन गुन्हे उघडकीस आणने, आरोपी व संशईतावर दाखल पुर्व गुन्हयांचे अभिलेख पडताळणी करुन गुन्हयांच्या स्वरुपानुसार त्यावर प्रतिबंधक कारवाई करणे.अशा विविध कामगिरींचे मुल्यांकन करुन प्रत्येक महिण्यास राज्यातील उत्कृष्ठ कामगिरी करणार्या जिल्हयाची क्रमवारी जाहीर करण्यात येते. ‘सीसीटीएनएस’ क्रमवारीत बीड पोलीस राज्यात प्रथम आले आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक हे सीसीटीएनएस सेल नोडल अंमलदार व सर्व पोलीस ठाण्यांचे सीसीटीएनएस नोडल अंमलदार यांच्या अथक परिश्रमाचे फलित आहे. यापूर्वी मागील 6 महिण्यात दुसरा व तिसरा क्रमांक राखून चांगल्या कामगिरीत सातत्य राखले व या महिन्यात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.
सीसीटीएनएस प्रणाल ठरली महत्वाचे माध्यम
सीसीटीएनएस नोडल अंमलदार यांनी यापुर्वी सीसीटीएनएसच्या मदतीने 100 पेक्षा जास्त चोरीस गेलेल्या वाहनांचा शोध लावलेला आहे. तसेच वारंवार गुन्हे करणार्या आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी त्यांचा पुर्व गुन्हे अभिलेख सदर प्रणालीच्या मदतीने अद्ययावत घेऊन मागील 3 वर्षात 40 गुन्हेगांराविरुध्द एमपीडी व 3 गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्काप्रमाणे तसेच 20 टोळयांवर जिल्ह्यातून हद्यपारीची कारवाई करण्यास मदत झालेली आहे.
Leave a comment