7 आरोपी ताब्यात, दोन दिवसांची पोलिस कोठडी

 

बीड ग्रामीण पोलिसांची जालना जिल्ह्यात कारवाई

 

बीड | वार्ताहर
 
पेट्रोल पंपालगत रात्रीच्या सुमारास उभ्या वाहनातील डिझेल कॅन्डमध्ये भरून चोरून नेणार्‍या परप्रांतीय टोळीचा बीड ग्रामीण पोलिसांनी भांडाभोड केला. जालना जिल्ह्यातील चंदनझिरा येथे या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ताब्यात घेतलेल्या सातही आरोपींना दि.13 एप्रिल रोजी बीड सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान मागील चार महिन्यांपासून या परप्रांतीय टोळीने बीड जिल्ह्यासह शेजारच्या जालना व औरंगाबाद जिल्ह्यात उभ्या वाहनातून डिझेल चोरी करत धुमाकूळ घालत लाखो लिटर डिझेल चोरी करून वाहन चालकांची मोठी लूट केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
सय्यद मुक्तार सय्यद करीम (44, रा.लक्कडकोट जि.जालना), खेमचंद तुलसीराम जाटो (34, रा.लक्ष्मीनगर, जि.साजापूर, राज्य मध्यप्रदेश), शोकत मजीद मेव (36), अनिलकुमार   बाबुलाल (36), हफिज कासम खॉ (28), अशोक नजीर चावरे (30, सर्व रा.दुपाडा, मोहर बडोपिया, जिल्हा साजपूर, राज्य मध्यप्रदेश) व आवेश खान दादेखान (32, रा.मिल्लतनगर, जि.जालना) यांचा आरोपीत समावेश आहे. 8 फेब्रुवारी 2022 रोजी बीड ग्रामीण ठाणे हद्दीतील नामलगाव येथील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असणार्‍या 5 ट्रकमधील तब्बल 1 लाख 3 हजार 158 रूपये किंमतीचे 1100 लिटर डिझेल चोरीला गेले होते. हा सारा प्रकार पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास घडला होता. या प्रकरणी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक सतीश राजाभाऊ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
 
महत्वाचे म्हणजे डिझेल चोरीचा सर्व प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाला होता. एक स्कॉर्पिओ व  एका कारमध्ये डिझेल भरलेल्या कॅन्ड आरोपी ठेवतांना दिसत होते. पोलिसांनी या अनुषंगाने संपूर्ण तपास सुरू केला होता. तपासाअंती घटनेच्या दोन तासापूर्वी ही दोन्ही वाहने पाडळसिंगी (ता.गेवराई) येथील टोलनाक्याहून नामलगावकडे आल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी सखोल तपास करत सुरूवातीला मुक्तार सय्यद यास 12 एप्रिल रोजी जालना येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने डिझेल चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. त्यानंतर इतर सर्व आरोपी तसेच चोरीचे डिझेल विकत घेणार्‍या एका आरोपीस 12 एप्रिल रोजी जालना जिल्ह्यातील गजाआड केले. बुधवारी सातही आरोपींना बीड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस आता अधिक तपास करत आहेत.प्रभारी पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, ग्रामीण ठाण्याचे पोनि.संतोष साबळे, सहाय्यक निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पवन राजपूत, पो.ना.अंकुश वरपे, पो.ना.दिगांबर शिंदे, पो.ना.गणेश कांदे, पो.ना.दादासाहेब सानप यांनी ही कारवाई केली.

स्वस्तात डिझेल घ्यायचे अन् चढ्या दराने विकायचे!

या प्रकरणातील सय्यद मुक्तार सय्यद करिम हा मुख्य आरोपी असून तो त्याच्या इतर 5 साथीदारांना उभ्या वाहनातून डिझेल चोरी करावयास सांगायचा. नंतर त्यांच्याकडून तो स्वस्तात डिझेल विकत घ्यायचा. नंतर हेच डिझेल तो आरोपी आवेश खान दादेखान यास चढ्या दराने विकायचा त्यामुळे फुकटात अधिकचे पैसे मिळायचे अन् नंतर याच पध्दतीने ते अनेक ठिकाणी डिझेल चोरी करायचे अशी माहिती पोलिस तपासात समोर आली.


दोन स्कॉर्पिओसह पावणे सात लाखांचा मुद्देमाल जप्त

डिझेल चोरी करण्यासाठी ही टोळी दोन स्कॉर्पिओ जीपचा वापर करायची. पेट्रोल पंपालगत उभ्या असलेल्या वाहनांमध्ये कोण आहे याची अगोदर रेकी करायचे. त्यानंतर स्कॉर्पिओतील कॅन्ड व पाईप बाहेर आणून ट्रकच्या डिझेल टँकचे लॉक तोडून तोंडावाटे पाईपने हवा आत घेत डिझेल कॅन्डमध्ये भरायचे. कॅन्ड भरताच ते तेथून पसार व्हायचे. त्यांचा हा गोरख धंदा दररोज मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास सुरू असायचा. बीड ग्रामीण हद्दीत नामलगाव येथील पेट्रोल पंपावर अशाच प्रकारचा गुन्हा 8 फेब्रुवारी 2022 रोजी घडला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला. त्यातून ही टोळी जेरबंद झाली. ताब्यात घेतलेल्या चोरट्यांकडून 2 स्कॉर्पिओ, पाईप व डिझेल असा एकूण 6 लाख 78 हजार 850 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बीड जिल्ह्यातील पाच गुन्हे उघड



या परप्रांतीय टोळीने बीड जिल्ह्यात डिझेल चोरीचे पाच गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. यात नामलगाव, गेवराई ठाणे हद्दीत 2, माजलगाव शहर ठाणे हद्दीत 1, माजलगाव ग्रामीण हद्दीत 1 अशा पाच गुन्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी ठाणे हद्दीत 1 आणि जालना जिल्ह्यातील बदनापूर ठाणे हद्दीत डिझेल चोरीचे 2 गुन्हे  केल्याची कबूली आरोपींनी दिली आहे.
 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.