बजरंगी ढोल पथक असणार प्रमुख आकर्षण
संयोजन समितीकडून जय्यत तयारी

बीड । वार्ताहर
मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सवानिमित्त बीड शहरात येत्या 10 एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बीड शहरात 2015 पासून सर्व हिंदू समाजाचे संघटन व्हावे या हेतूने श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे या शोभायोत्रेचे आयोजन केले जात आहे.गत दोन वर्ष कोरोना महामुरीमुळे यामध्ये खंड पडला. यावर्षी प्रथमच नियमामध्ये शिथीलता दिल्यामुळे श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे. पेठबीडमधील बजरंगी ढोल पथकही या शोभायात्रेत सहभागी होणार असून शोभायात्रेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीच्या पदाधिकार्यांनी केले आहे.
येत्या 10 एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे श्रीराम नवमी दिवशी बीड शहरात भव्य शोभायात्रा व दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. दुचाकी रॅली सकाळी 9 वाजता शहरातील बार्शी नाका येथील गणपती मंदिरापासून निघेल. नंतर ती कंकालेश्वर मंदिर, डॉ.आंबेडकर पुतळा, सुभाष रोड,माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवराज पान सेंटर, केएसकेकॉलेज, तुळजाई चौक, नगर नाका, भगवानबाबा चौक, अंबिका चौक, साठे चौक, मोंढा रोड, मोंढा मार्गे कंकालेश्वर मंदिर येथे पोहचेल.तेथे या दुचाकी रॅलीचा समारोप होणार आहे. यात अंदाजे 100 दुचाकीस्वार सहभागी होतील. तसेच याच दिवशी दुपारी 2 वाजता कंकालेश्वर मंदिर येथून शोभायात्रा निघेल. तिथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,माळीवेस, साठे चौक, शिवाजी महाराज पुतळा जवळ आरती करून समारोप होईल असे संयोजन समितीने सांगीतले. कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय बीडमध्ये ही भव्य शोभायात्रा काढली जाते.
बजरंगी ढोल पथक प्रमुख आकर्षण
यंदा श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. या शोभायात्रेत भगवान श्रीरामांची भव्य मूर्ती आकर्षक सजवलेल्या रथात ठेवली जाणार आहे. तसेच या रथासमोर पेठ बीड भागातील 70 तरुणांच्या संचाचे ‘बजरंगी ढोल पथक’ ढोल वाद्याचा गजर करणार आहे. बजरंगी ढोल पथक हे दरवर्षी आयोजीत केल्या जाणार्या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण असते. सध्या या पथकातील सदस्य दररोज खंडेश्वरी मंदीर परिसरात सराव करतात.महत्वाचे म्हणजे या पथकातील हे सर्व तरुण पेठ बीडमधील आहेत. या पथकाचे ढोलवाद्य शोभायात्रेत सादर होणार असल्याची माहिती संयोजन समितीने दिली.
अधिकाधिक संख्येने मिरवणूकीत सहभागी होण्याचे आवाहन
येत्या 10 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात दुचाकी रॅली तर दुपारी 2 नंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे मागील तीन वर्ष भगवान श्रीरामांची शोभायात्रा काढता आली नव्हती, यंदा मात्र निर्बंध नाहीत, त्यामुळे हिंदू बांधव या शोभायात्रेत प्रंचड संख्येने सहभागी होणार आहेत. तरुण, युवकांसह नागरिकांनी अधिकाधिक संख्येने या दुचाकी रॅली व शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी शहरासह विविध भागातील मंदिरामध्ये महाआरती होत आहे. तसेच समाज माध्यमावरुनही आवाहन केले गेले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment