बीड । वार्ताहर
बीड शहर आणि परिसरात चोरटे सक्रीय झाले आहेत. शहरातील स्वराज्यनगर भागात घराकडे जाणार्या शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी धुमस्टाईल लंपास केल्याची घटना ताजी असतानाच आता रुग्णालयासमोरुन जाणार्या एका नागरिकाच्या हाताला झटका देवून दोन चोरट्यांनी मोबाइल व रोकड लंपास केली. 22 मार्च रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास जालना रोडवरील एका खासगी रुग्णालयासमोर ही घटना घडली.
आनंद रमाशंकर मिश्रा (50,रा.भक्ती कन्स्ट्रक्शन,बीड)असे त्या नागरिकाचे नाव आहे. मिश्रा हे 22 रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास शहरातील जालना रोडवरील एका खासगी रुग्णालयासमोरुन जात होते. यावेळी तिथे आलेल्या दोन अनोळखींनी मिश्रा यांच्या हाताला झटका देत त्यांच्याकडील 23 हजार रुपयांचा मोबाइल व 500 रुपयांची रोकड असा ऐवज बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. या घटनेने भयभीत झालेल्या आनंद मिश्रा यांनी शिवाजीनगर ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यावरुन अज्ञात दोघांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Leave a comment