बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केली भूमिका
बीड | वार्ताहर
माझी माय-बाप जनता हाच माझा आधारस्तंभ आहे. त्यांच्यामुळेच माझे राजकारण आहे. धरसोड करून राजकारण करता येत नसतं. माझे पद गेले म्हणून मी भाजपमध्ये जाणार, मी राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहे, या आणि अशा काही गोष्टी कोणी विनाकारण पसरवू नयेत. पक्षाचे यात काही चुकले नाही.तो पक्षाचा निर्णय आहे, मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे अशी स्पष्ट भूमिका जि.प.चे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी आज शनिवारी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मांडली.
बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे हे माझ्या ह्रदयात असलेले नेते आहेत. त्यामुळे माझं पद गेलं म्हणून माझी पक्ष निष्ठा ढळली अस कोणी समजू नये. मी काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मला जिल्हाध्यक्षपदी काम करण्यास पक्ष नेतृत्वाने संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.आजपर्यंत मी प्रामाणिकपणे चांगले काम करण्याचा प्रयत्न केला.सर्वांना एकत्रित ठेऊन मी काम केले. पक्षाचा जिल्हाध्यक्ष असताना मला लोकसभा उमेदवारी दिली.
25 फेब्रुवारी रोजी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती झाली.विद्यमान जिल्हाध्यक्ष यांचा कार्यकाळ दोन महिन्याचा आहे.धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, बाळासाहेब आजबे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि मी कार्य मुक्त झालो. 4 वर्ष 8 महिने मी पदावर काम करू शकलो याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.सर्व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याचे मी आभार मानतो कारण त्यांच्यामुळेच मला काम करण्याची संधी मिळाली होती.2019 च्या निवडणूकीमध्ये मला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली.पराभव झाला मात्र त्याचा कसलाही परिणाम पक्ष संघटनांवर होऊ दिला नाही.दरम्यान गत एक महिन्यापासून कौटुंबिक कारणामुळे मी संपर्कात नव्हतो.असे सांगत बजरंग सोनवणे म्हणाले,1992 रोजी मी वयाच्या 21 व्या वर्षी मी पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली आत्तापर्यंत 31 वर्ष मी राजकारणात टिकून आहे.पराभवातून आलेल्या अनुभवातून मी शिकत गेलो. लोकसभा पराभूत झालो पण कालच्या नगर पालिका निवडणुकीत कोणी कस काम केले, याचा विचार झाला पाहिजे या निवडणुकीत माझी मुलगी पराभूत झाली. तरी मी अपयश पचवून आगामी काळात वाटचाल करत राहणार आहे. मात्र या निवडणुकीत काही लोक उघडे पडले असे त्यांनी सांगितले, मात्र त्यांचा नेमका रोख कोणाकडे होता हे त्यांना विचारल्यानंतर त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले.
पुढे ते म्हणाले, पक्षीय काम करताना मी कुठंही कमी पडलो नाही.तरीही आयात उमेदवार नेमका विधानसभा निवडणुकीत का आणला? तो कोणी आणला? याचे गौडबंगाल अजून मला कळलं नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता असल्याने आम्ही काही म्हणालो नाही. जिल्हा परिषद निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे आवश्यक मनुष्यबळ असतानाही आमची सत्ता आली नाही, याची खंत वाटली. असे सांगत बजरंग सोनवणे म्हणाले, मी पदावर असताना कोणाची बदली, कोणाच्या अनियमिततेचे काम, कुणाची गुत्तेदारी यासाठी मी कधी कुणाची शिफारस सुद्धा केली नाही, पक्षाच्या विचारानुसार केवळ विकास कामे मागण्यासाठी मी पक्षाच्या लेटरहेडचा वापर केला. लोकसभेला मी पराभूत झालो असेल मात्र विधानसभा निवडणुकीत आम्ही पक्षाचा उमेदवार निवडून आणला.सर्वांच्या संघटनातून पक्ष पुढे घेऊन जातो हे मी मानतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना कोणावरही अन्याय होणार नाही अशी भूमिका घेतली. 61 ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणल्या, सेवा सहकारी सोसायटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला न्याय मिळला पाहिजे ही माझी पहिल्यापासून भूमिका राहिली आहे.बीड जिल्ह्यातील ऊस संपेल की नाही, ही खूप मोठी परीक्षा आहे. माझं म्हणणं हेच आहे की उसचे योग्य नियोजन केले पाहिजे असे ते म्हणाले.
Leave a comment