जय महेश कारखाना अधिकारी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
माजलगाव / प्रतिनिधी
तालुक्यातील पवारवाडी येथील खासगी तत्वावरील असलेल्या जय महेश साखर कारखान्याच्या अधिका-यांना शेतकरी सत्यप्रेम थावरे यांच्या आत्मदहन प्रकरणाच्या वाटाघाटीसाठी आनंदगाव शिवारात बोलावण्यात आले होते. यावेळी शेतकी अधिकारी सुजय पवार यांना मारहाण झाली होती. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. याप्रकरणी माजलगाव न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश आज गुरूवारी ता. 13 दिंद्रुड पोलिसांना दिले असल्याची माहिती अॅड. दिपक देशमुख यांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, जय महेश कारखान्याकडे आनंदगाव येथील शेतकरी सत्यप्रेम मधुकर थावरे यांचा उस गाळपास आणावा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा या शेतक-याने दिला होता. इशारा देउनही कारखान्याने उस गाळपास आणला नाही. या कारखान्याचे शेतकी अधिकारी सुजय पवार यांना वाटाघाटीसाठी दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी बोलावले होते. यावेळी सुजय पवार यांना शिवीगाळ करत मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी सुजय पवार यांनी दिंद्रुड पोलिसात तक्रार दिली
होती तसेच जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे देखिल तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याने अखेर शेतकी अधिकारी पवार यांनी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचेकडे फिर्याद दाखल केली होती. यावर सुनावणी होउन न्या. एस. एम. जाधव यांनी आरोपी गंगाभिषण काशिनाथ थावरे, संग्राम गंगाभिषण थावरे, अनिल आत्माराम गायके, अंकुश बाळासाहेब गायके, पुंडलिक सुधाकर थावरे, विलास भगवान थावरे, हनुमान मुक्ताराम थावरे, पांडुरंग सुधाकर थावरे, राजेभाउ नाईकनवरे, अशोक नामदेव थावरे यांचेवर कलम 323, 341, 143, 294, 147, 149, 160, 504, 506 34 भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान जय महेश कारखान्याचे शेतकी अधिकारी सुजय पवार यांच्या वतीने अॅड. दिपक देशमुख यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. प्रसाद कुलकर्णी यांनी सहकार्य केले.
Leave a comment