बीड । वार्ताहर
डिसेंबर-जानेवारी महिना म्हटलं की शाळांमध्ये स्नेह संमेलनाचे वारे वाहू लागतात. परंतु गत दोन ते तीन वर्षांपासून कोविड-19 रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे स्नेहसंमेलने झाली नाहीत. परंतु जिल्हा परिषद शाळे मधील विद्यार्थ्यांनी बाल आनंद मेळाव्यामध्ये फास्ट फूड ऐवजी शेतातील ताजा भाजीपाला आणून स्टॉल लावले आणि बाल आनंद मेळावा साजरा करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील कोठारबन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षिका प्रभावती जाधवर यांनी सावित्री ते जिजाऊ सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांकरीता बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते. या बालआनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी देखील फास्ट फूड ऐवजी शेतातील ताजा भाजीपाला आणून स्टॉल लावले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या बाल आनंद मेळावा याबद्दल आयोजक सौ प्रभावती जाधवर यांनी सांगितले की, फास्ट फूड बालकांना फारच प्रिय असते. शहरातील शाळेत होणार्या बाल आनंद मेळाव्यात केवळ फास्ट फूडचाच प्रचार केला जातो. परंतु आमच्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी फास्ट फूड टाळुन शेतातील ताज्या भाजीपाल्याचे स्टॉल लावून सकस आणि सर्वांगीण आहाराचा अवलंब करण्याचा संदेशच जणू आपल्या कृतीतून देण्याचे काम केले आहे,
याचा मला अभिमान वाटतो.या बाल आनंद मेळाव्यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. गावकर्यांनी या बाल आनंद मेळाव्याचे कौतुक केले आणि परिसरातही नागरिकांमध्ये या आगळ्यावेगळ्या बाल आनंद मिळावा याची चर्चा होती.या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मुख्याध्यापक राठोड डी.एच.,सहशिक्षिका सौ प्रभावती जाधवर यांच्यासह सहशिक्षक शदासरे सर, राठोड जी.एम. बडे सर, चव्हाण सर, भस्करे सर, इंगळे सर मुख्याध्यापक यांनी परिश्रम केले.
Leave a comment