बर्दापूर-अंबासाखर महामार्ग नव्हे, मृत्यूचा सापळा

अरुंद रस्त्यामुळे भीषण अपघातांची शृंखला

अंबाजोगाई । वार्ताहर
लातूर - अंबाजोगाई हा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग बर्दापूरच्या पुढे अज्ञात कारणास्तव दोन पदरी करण्यात आला. यामुळे बर्दापूर ते अंबासाखर कारखाना दरम्यान अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून सातत्याने निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. रविवारी सकाळी या रस्त्यावर नंदगोपाल डेअरी समोर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चार प्रवाशांना जीव गमवावा लागला तर 14 जण गंभीर जखमी झाले आहेत.
औरंगाबाद (सिडको) आगाराची बस (एमएच 20 बीएल 3017) रविवारी सकाळी लातूरहून औरंगाबादकडे निघाली होती. बर्दापूरच्या पुढे नंदगोपाल डेअरीच्या समोर सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास या बसचा समोरून येणार्‍या ट्रकसोबत (केए 56-5494) जोरदार धडक झाली. हा ट्रक औरंगाबादहून हैदराबादकडे यंत्रसामुग्री घेऊन निघाला होता. या भीषण अपघातात बसचे वाहक चंद्रशेखर मधुकर पाटील (रा. कांचनवाडी, औरंगाबाद), नलिनी मधुकर देशमुख (72, रा. ज्योती नगर, औरंगाबाद), आदिल सलीम शेख (29, रा. अंबाजोगाई) आणि मोहम्मद सादिक नवाब पटेल (65) या चौघांचा जागीच मृत्यू झाला.
 

तर, योगिता भागवत कदम (38, लातूर), भगवान निवृत्ती कांबळे (55, लातूर), अस्मा बेगम फहिम पठाण (30, बीड), हरिमठ रघुनाथ चव्हाण (47, लातूर), प्रकाश जनार्दन ठाकूर (55, शिंदी), माधव नरसिंगराव पठारे (65, जालना), अयान पठाण (13, बीड), दस्तगीर अयुब पठाण (20, निलंगा), अलादिन आमिर पठाण (30, निलंगा), बळीराम संभाजी कराड (22, खोडवा सावरगाव), जिहान फहिम पठाण (12, बीड), बसचालक सुभाष भगवान गायकवाड (43, पिंपळगाव), संगीता बजरंग जोगदंड (44, लातूर) आणि सुंदर ज्ञानोबा थोरात (48, पांगरी) हे 14 गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये, बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अशोक खरात, पीएसआय शिवशंकर चोपणे, एएसआय लक्ष्मण बिडगर, महादेव आवले, पांडुरंग श्रीमंगले, राजाभाऊ थळकरी  यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून तातडीने स्वाराती रुग्णालयात पाठवून दिले. अपघाताची भीषणता एवढी होती की, दोन्ही वाहनांना क्रेनच्या साह्याने वेगळे करून जखमींना बाहेर काढावे लागले. दरम्यान पाऊस पडल्यामुळे व थंडीमुळे पहाटेपासून मोठे धुके पसरले होते. त्यामुळे एका वाहनास ओव्हरटेक करून पुढे जाण्याच्या नादातएसटी बस चालकाला समोरून येणार्‍या ट्रकचा अंदाज आला नाही आणि बस ट्रकच्या डाव्या बाजूला आदळली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात बस फाटत गेल्याने आतील प्रवाशांना गंभीर इजा झाले. या बसमधून 18 प्रवाशी प्रवास करत होते.

अंबाजोगाईकरांसह अधिकारी मदतीला

या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपिन पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर स्वाराती रुग्णालय येथे येऊन जखमींची विचारपूस व अडचणी सोडवण्याचे काम केले. तसेच अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा तात्काळ स्वाराती रुग्णालय येथे हजर होऊन जखमींना लवकरात लवकर उपचार मिळावे म्हणून प्रयत्नशील राहिले. यासोबतच सामाजिक कार्यकर्ते शेख मुख्तार, जहांगीर पठाण, विष्णू वैद्य, दीपक कांबळे, यशवंत पानखडे यांच्यासह अनेकांनी जखमींना मदत केली. राष्ट्रवादीचे नेते रणजीत लोमटे यांनीही रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली.

‘स्वाराती’मधील डॉक्टर, कर्मचार्‍यांची तत्परता

स्वाराती रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, डॉ. सतीश गिरेबोईनवाड, डॉ. नामदेव जुने, डॉ.अंकुश असोले, डॉ. योगेश गालफाडे, डॉ. प्रमोद दोडे, डॉ. कृष्णा नागरगोजे, डॉ.सचिन अब्दागिरे, डॉ. अमित लोमटे, सीएमओ डॉ. माधुरी विटेकर,डॉ.लहू चौरे, डॉ. बालिका ठोंबरे, डॉ. नितीन साखरे, अधिपरिचारिका कल्पना कुरमथकर, आशा माने, इतर सर्व परिचारिका, 108 रुग्णवाहिकेच्या डॉ. स्वामी, कालक अमर मुंडे यांनी सर्व जखमींना रुग्णालयात आणण्यापासून ते उपचार होईपर्यंत यथायोग्य काळजी घेतली. त्यामुळे जखमींना वेळेवर आणि योग्य उपचार मिळू शकले.

अंबाजोगाईच्या अभियंत्याचाही मृत्यू

अंबाजोगाई येथील सदर बाजार येथे राहणारे अभियंता आदिल सलीम शेख (29) हे काल बहिणीस सोडण्यासाठी लातूरला गेले होते.या अपघातात त्यांच्यावर काळाने घाला घातला. सहा महिन्यापूर्वीच आदिल यांचा विवाह झाला होता.आई-वडिलांना एकुलता एका मुलगा असणारे आदिल यांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
 
 
 

चौपदरीकरण नसल्याने अपघात वाढले

लातूर-अंबाजोगाई हा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग बर्दापूरच्या पुढे अज्ञात कारणास्तव दोन पदरी करण्यात आला. परिणामी बर्दापूर ते अंबासाखर कारखाना दरम्यान भीषण अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून सातत्याने निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. अंबासाखर कारखाना येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे आश्वसन दिले होते. मात्र, कालौघात गडकरींना या आश्वासनाचा विसर पडला आणि अपघातांची शृंखला कायम राहिली आहे. अनेक घरातील कर्ते पुरुष, स्त्रियांचा या रस्त्याने बळी घेतल्याने कुटुंब उध्वस्त झाली आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेऊन या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.