ग्रामस्थांनी केला आरोप
पैठण तालुक्यातील नवगाव येथे गेल्या दहा वर्षांपासून रखडली योजना
विहामांडवा \ वार्तहार
पैठण तालुक्यातील गाव नवगाव येथे गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत ठेकेदाराने सुरू केलेले पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे काम बंद पाडले. त्यामुळे गावात ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांमध्ये तणावाचे वातावरण आहे
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील नवगाव येथे दरवर्षी होणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत २०११-१२ साली जवळपास ३ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. संबंधित कामाचा ठेका हा जयश्री कंन्स्ट्रक्शन औरंगाबाद यांना देण्यात आला. प्रत्यक्षात कामास २०१३-१४ ला सुरुवात झाली. यात गोदावरी नदीत पूल उभारणे, पंप हाऊस व जलकुंभ उभारणे तसेच गावात ५ ते ६ किलोमीटर पाईपलाईन टाकणे आदी बाबींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या कामास २०१३-१४ ला सुरुवात झाल्यानंतरही योजना दोन वर्षांच्या कालावधीत पुर्णत्वास यायला हवी होती. मात्र, ठेकेदाराच्या निष्काळजीपणा तसेच ग्रामपंचायत सदस्यांच्या टक्केवारीच्या भांडणात ही योजना तब्बल आठ नऊ वर्षाचा कालावधी उलटून देखील योजनेतील पंप हाऊसचे काम अर्धवट आहे. तसेच अंदाजपत्रकात दर्शविण्यात आलेला नदीवरील बांधलेल्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वर्तमानस्थितीत गावात जलवाहिनीच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे.
मात्र, जयश्री कन्स्ट्रक्शन हे निकृष्ट दर्जाचे तसेच नॉन आयएसआय मार्क असलेल्या पीव्हीसी पाईप टाकण्याचे काम करीत असल्याने संतप्त गावकऱ्यांनी ठेकेदाराला पाईपच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करीत पाईपलाईन टाकण्याच्या कामाला आक्षेप घेत काम बंद पाडले. गुळगुळीत सिमेंट रस्ते जेसीबीच्या मदतीने खोदून ठेवल्याने गावातील रस्त्यांची बाट लागली असून काम बंदमुळे खड्ड्यात गावातील वयोवृद्ध महिला व विद्यार्थी पडून एखादी दुर्दवी घटना घडण्याची भीती गावकरी व्यक्त करीत आहेत.
दरम्यान नवगावातील राष्ट्रीय पेयजल योजनेत झालेल्या संपूर्ण कामाची त्रयस्थ समितीच्या मार्फत चौकशी करून निकृष्ट काम करणाऱ्या तसेच कामात कसूर करणाऱ्या ठेकेदार जयश्री कन्स्ट्रक्शन विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी ग्रामसभेत केली असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री, जलसंपदा मंत्री तसेच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद औरंगाबाद, गटविकास अधिकारी पैठण यांना निवेदन दिले आहे.
चांगल्या दर्जाचे काम करण्याच्या दिल्या सूचना
जलवाहिनीचे काम सुरू असताना ठेकेदलाकडून चार-सहा जुने व निकृष्ट दर्जाचे पीव्हीसी पाईप अनावधानाने टाकण्यात आले. ते काढून आयएसआय मार्क असलेले उत्तम दर्जाचे पाईप टाकण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला पत्र दिले असून बुधवार रोजी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता काम ाच्या ठिकाणी भेट देणार आहेत. साहेबराव दगडखैरे, सरपंच, नवगाव ता. पैठण
उपमुख्यमंत्र्याच्या आदेशाला अधिकाऱ्यांकडून खो
एक वर्षांपूर्वी या योजनेत झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी मी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तक्रार केली होती. तक्रारीची तत्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित विभागाला सखोल चौकशी करण्याच्या सूचना मेलद्वारे केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या आदेशाला खो दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चौकशी गुंडाळली की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-. गुलदाद पठाण, ग्रा.पं. सदस्य,
Leave a comment