सायबर पोलीसाच्या सखोल चौकशीत अनेक बडे मासे गळाला लागणार
बीड । वार्ताहर
राज्यात गाजत असलेल्या आरोग्य भरती आणि पेपरफुटी घोटाळ्याचे मुख्य केंद्र हे मंत्रालयासोबतच बीडचे हिवताप कार्यालय आहे.या कार्यालयातील कर्मचारी जीवन सानप आणि त्याचा अटकेत असलेला भाऊ संजय सानप या दोघांनी हजारो बेरोजगारांकडून लाखो रुपयांची माया गोळा करत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (एमपीडब्ल्यु) आणि गट ड च्या पेपर फोडण्याच्या प्रकारात सहभाग घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सायबर पोलीसांनी बीडच्या हिवताप कार्यालयातील दस्ताऐवज गोळा केल्यास गेल्या दहा वर्षात अनेक गैरप्रकार झाल्याचे उघड होईल.
आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये पेपर फुटल्याची घटना उघडकीस आली आणि यामध्ये बीड जिल्ह्यातील सात जणांना आत्तापर्यंत सायबर पोलीसांनी अटक केली आहे. यातील राजेंद्र सानप हा पाटोदा तालुक्यातील वडझरी या गावचा राहिवासी असून या गावातील 50 पेक्षा अधिक तरुण आरोग्य खात्यात एमपीडब्ल्यु आणि इतर पदांवर नौकरीत लागलेले आहेत. याच वडझरी गावातील भाजयुमोचा पदाधिकारी असलेला संजय सानप याला पोलीसांनी सोमवारी ताब्यात घेतलेे. त्याचा भाऊ जीवन सानप हा बीडच्या हिवताप कार्यालयात नौकरीस आहे. तो गेल्या बारा दिवसांपासून कार्यालयातूनच नव्हे तर बीडमधून देखील फरार झालेला आहे. कार्यालयाचे प्रमुख डॉ.बेग यांच्याकडेदेखील पोलीसांनी दुरध्वनीव्दारे जीवन सानप याची चौकशी केल्याची चर्चा आहे.
पाटोदा तालुक्यातील नायगाव येथील एमपीडब्ल्यु राजेंद्र शाहुराव सानप, वाहली प्राथमिक आरोग्य केंद्रातील सचिन सानप,पौंडुळ येथील अशोक राख हे तीन कर्मचारी दहा ते बारा दिवसांपासून गायब आहेत. त्यांचे मोबाइल देखील बंद आहेत. या सगळ्या कर्मचार्यांना नौकरी लावण्यात जीवन सानप आणि संजय सानप यांनी मोठा वाटा उचलला असून लाखो रुपये गोळा केले आहेत.
संजय सानप याचे बीडमध्ये दोन बंगले असून समर्थ मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजुला 11 हजार स्वेअरफुटच्या आवारात त्याचा अलिशान असा बंगला बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याच्याकडे फॉरच्युनर, इंडेविअर अशा अलिशान गाड्या असून गावाकडेदेखील त्याने मोठा बंगला बांधला आहे. संत ज्ञानेश्वर नगर भागातदेखील त्याचे मोठे घर आहे. एक एमपीडब्ल्यु असलेला साधा कर्मचारी राजकीय पक्षाच्या माध्यमातून भरती घोटाळे करत असेल त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर अनेक बडे मासे हाती लागण्याची शक्यता आहे.
बीडच्या हिवताप कार्यालयातून आजपर्यंत गेल्या दहा ते पंधरा वर्षात जेवढ्या बेरोजगारांना हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले आणि त्या माध्यमातून त्यांना नोकर्या मिळाल्या, त्या सगळ्यांचीदेखील चौकशी करणे गरजेचे आहे. या काळात जिल्हा हिवताप अधिकारी असलेल्या अधिकार्यांची आणि जीवन सानप याच्या संपत्तीचीदेखील चौकशी केल्यास तुकाराम सुपे याच्यापेक्षा अधिक मोठे घबाड हाती लागू शकते. त्यामुळे बीडच्या जिल्हा हिवताप कार्यालयाची चौकशी होणे गरजेचे आहे.
Leave a comment