जिल्ह्यात 7 लाख नागरिकांची लसीकरणाकडे पाठ !

बीड । सुशील देशमुख 

कोरोनाच्या दोन लाटा जिल्ह्याने अनुभवल्या. अनेक कुटूंबातील कर्तीधर्ती अन् आधार असलेली माणसे कोरोनाच्या संसर्गात मृत्यूमुखी पडली. इतके सारे भीषण सत्य अनुभवल्यानंतरी जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक ठरलेली लस घेण्याकडे अजुनही नागरिकांचा ओढा नसल्याचेच दिसत आहे. कारण बीड जिल्ह्यात अजुनही तब्बल 7 लाख 40 हजार लोकांनी लशीचा पहिलाही डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. आता दक्षिण आफ्रिकेतून पुढे आलेल्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरियंटमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. त्यामुळे लस घेणे अन् सुरक्षित राहणे इतकी जबाबदारी सर्वांची आहे. नागरिकांनी लस घ्यावी म्हणून स्वत: जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह संपूर्ण आरोग्य अन् महसूल,पोलीस यंत्रणा रस्त्यांवर,लोकांच्या गल्लोगल्ली जावून घरोघरी लस देण्यास जात आहे, तरीही अनेकजण लस घेण्यास पाठ फिरवत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव तूर्तास तरी आटोक्यात आहे. दुसर्‍या लाटेत जिल्ह्यात प्रतिदिन तब्बल 1500 नवे रुग्ण आढळत होते, रुग्णांना उपचाराला दाखल करण्यासाठी शासकीय अन् खासगी रुग्णालयात खाटा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, अनेकांना वेळेवर ऑक्सीजन, व्हेंटिलेटर न मिळाल्याने प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. यातच कोरोना बाधितांचे मृत्यूही ओढवले. ही सगळी परिस्थिती जिल्ह्याने अनुभवली असतानाही आता कोरोना प्रतिबंधक लस घेण्याकडे अनेकजण पाठ फिरवत आहेत. वास्तविक लसीचे डोस सुरु झाल्यानंतर याच जिल्ह्यात लोक रांगेत उभे राहुन आपल्याला लस मिळावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते, मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव घटला अन् लोकांची ‘काही नाही होत’ ही मानसिकताही वाढीस लागली, त्यामुळेच आजही जिल्ह्यातील 7 लाखाहून अधिक लोक लसीकरणापासून दूर आहेत. आता या सार्‍या लोकांनी वेळीच लस घ्यावी यासाठी जिल्हाधिकार्‍यांपासून आरोग्य यंत्रणेला आवाहन करत घराघरापर्यंत पोहचावे लागत आहे. 
आजपर्यंत बीड जिल्ह्यातील लसीकरणासाठी पात्र 21 लक्ष 55 हजार 990 नागरिकांपैकी 14 लाख 15 हजार 592 नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.तसेच 6 लाख 82 हजार 733 नागरिकांचा दुसरा डोस देखील पूर्ण झाला आहे. पहिला डोस घेण्याचे प्रमाण 65.66 टक्के आणि दुसरा डोस घेण्याचे प्रमाण 31.67 टक्के आहे. जिल्ह्यातील नागरिकांना एकूण 20 लाख 98 हजार 325 लसीचे डोस देण्यात आले आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील 7 लाख 40 हजार 398 नागरिकांनी लसीचा कोणताही डोस घेतलेला नाही अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली. 

कोरोनाने आजपर्यंत 2830 जणांचा बळी 

कोरोनामुळे बीड जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 हजार 830 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंतच्या जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 540 इतकी झाली आहे; यापैकी 1 लाख 640 जणांनी कोरोनावर मात केली असून अजुनही जिल्ह्यात 70 रुग्ण उपचाराखाली आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख यांनी दिली. 

13 हजार खाटा, 343 व्हेंटीलेटर 

बीड जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्याचेही नियोजन केले जात आहे. रुग्णांसाठी 13 हजार 91 खाटा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यात खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. 80 कोविड केअर सेंटर, 48 डेडीकेटेड कोविड हॉस्पीटल व 42 डीसीएचसी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यामध्ये बहुतांशी खाटांना सेंट्रल लाईनद्वारे ऑक्सीजनची सुविधा असेल. तर, शासकीय व खासगी दवाखान्यांत 343 व्हेंटीलेटर खाटा उपलब्ध असतील अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिली.

 

आकडे सांगतात जिल्ह्याचे वास्तव 

पहिला डोस घेणारे-14,15,592 

दुसरा डोस घेणारे-6,82,733

एकूण लसीकरण- 20,98,325



लस न घेणारे-7,40,398 

पहिला डोस घेण्याचे प्रमाण -65.66 टक्के 

दुसरा डोस घेण्याचे प्रमाण -31.67 टक्के 

लसीकरणाचा प्रतिसाद का घटला

 सण उत्सवांमुळे नागरिक लसीकरणासाठी येत नसल्याचे दिसून येते. याशिवाय आता निर्बंध शिथीलझाल्याने काम धंदे सुरू झाले आहेत. त्यामुळे लस घेतल्यावर काही काळ विश्रांतीची वेळे येईल, लसीकरणासाठी वेळ जाईल, या शक्यतेमुळे लोक लसीकरणासाठी येत नसावेत, असे दिसते. त्यामुळे प्रशासनातर्फे जनजागृती मोहीम हाती घेण्यात येत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.