शेतकर्‍यांना दसर्‍यापूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहीर करा

बीड । वार्ताहर

 

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हयातील शेती पिकांचे तसेच शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले असून जीवित व वित्त हानी मोठया प्रमाणावर झाली आहे. अशा परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने दस-यापूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. दरम्यान जिल्हयात बोकाळलेला ’माफिया राज’ बंद करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

जिल्हयातील सर्वच तालुक्यांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. जिल्हयात 7 लाख 72 हजार हेक्टर खरीप पेरणी क्षेत्रापैकी 5 लाख 46 हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन, कापूस, उडीद, मुग, बाजरी आदी पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. गेवराई, माजलगांव, केज, अंबाजोगाई, आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, परळी, धारूर आदी भागांत केवळ उभ्या पिकांचेच नाही तर शेत जमिनीची माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. जुन ते आजपर्यंत 22 जण पुराच्या पाण्याने मृत झाले असून 465 जनावरे दगावली आहेत. 20 हजाराहून अधिक शेती पंप बंद पडली आहेत. माजलगांव धरणातून पाणी सोडल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली असून शेतात, घरात पाणी शिरल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. 24 पाझर तलाव देखील फुटले आहेत. 147 किलोमीटरचे रस्ते खराब झाले असून 69 पुलांचे नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, त्यातच पीक विमा मिळत नसल्याने शेतकर्‍यांवर आसमानी व सुलतानी असे दोन्ही संकट एकाचवेळेस आली आहेत. शासनाने अशा कठीण समयी त्यांच्या पाठिशी उभे रहावे आणि दस-यापूर्वी नुकसान भरपाई जाहीर करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

माफिया राज बंद करा

जिल्हयात गेल्या कांही महिन्यांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खून, दरोडे, मारामारी याबरोबरच महिलांवरील अत्याचार, जुगार, अवैध वाळू उपसा व वाहतूक आदींनी डोके वर काढले आहे. गुन्हेगार मोकाट सुटले असून त्यांना कायद्याचा अजिबात धाक राहिला नाही. सत्तेत बसलेल्या लोकांचा याला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याने सर्व सामान्य जनता त्रासली आहे. हा ’माफिया राज’ बंद करावा अशी मागणीही पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.