पोलिसांकडून मंदिर परिसरात निगराणी
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला असला तरी अजूनही रूग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा प्रशासनाकडून नवरात्र उत्सवापासून मंदिर उघडण्यास परवानगी दिली आहे असे असले तरी नवरात्र उत्सवा निमित्त भरणार्या यात्रा मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान नवरात्र उत्सवासाठी कडेकोट बंदबंस्त ठेवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी वेळोवेळी नाकाबंदी तसेच हॉटेल व लॉजची तपासणी संशायास्पद व्यक्ती आणि ठिकाणांची झाडाझडती घेतली जाणार आहे. या बरोबरच शहर आणि जिल्ह्यातील देवी मंदिर परिसरातही पोलिस तैनात राहणार आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक आर.राजा यांनी ही माहिती दिली.
यंदा कोरोनाच्या स्थितीमुळे मंदिर उघडली असली तरी नवरात्र उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे नियम शासनाने घालून दिले आहेत. त्यामुळेच मंदिर परिसरातील यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या ठिकाणी परवानगी दिली असली तरी कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले गेले आंहे. जिल्ह्यात नवरात्र उत्सवासाठी बाहेरील जिल्ह्यातून पोलिसांची एक तुकडी बंदोबस्तासाठी दाखल झाली आहे.
यासोबतच जिल्ह्यातील देवी मंदिराच्या ठिकाणी 75 पुरूष व 30 महिला पोलिसांचा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. याबरोबरच पोलिस ठाणेनिहाय गस्त राहणार आहे. तसेच 600 पुरूष होमगार्ड व 100 महिला होमगार्ड बंदोबस्तासाठी नेमले गेले आहेत.जिल्ह्यात नाकाबंदी बरोबरच संशयितांची झाडाझडती तसेच हॉटेल लॉजची तपासणी धार्मिक स्थळे या ठिकाणी तपासणी होणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून ते दसर्यापर्यंत जिल्ह्यात हा बंदोबस्त असणार आहे अशी माहिती पोलिस अधिक्षक आर.राजा यांनी दिली.
Leave a comment