निवेदने दिली,ग्रामस्थांनी जोडले हात; पुस गावठाण ते तळणी गाडी रस्त्याची दैना फिटेना;
अंबाजोगाई । वार्ताहर
जमिनीची मशागत करण्यापासून ते मालाचा शेवटचा दाणा घरी आणेपर्यंत शेतात ये-जा करावी लागते.ही वहिवाट उपलब्ध पांदण गाडी रस्त्यावरून होते.परंतू, पावसाळ्यात या पांदण रस्त्यावर पाणी वाहून ओढा आणि पाणी साचून चिखल तयार होतो.ओढ्याचे पाणी शेतात जाऊन शेती पिकांचे मोठे नुकसान होते.तसेच या चिखलातून साधे पायी जायचे असले तरी एक दोन फूट खोल चिखल तुडवीत जावे लागते.शेती अवजारे,बी-बियाणे,रासायनिक खते आदी साहित्य डोक्यावर वाहून न्यावे लागते.यामुळे सदरील वस्तू नेण्यात शक्ती खर्च होत असल्याने दिवसभर शेतातील मेहनतीचे कामे करायची कशी,असा प्रश्न निर्माण होतो अशी कैफियत एका शेतकर्याने व्यक्त केली.ही अवस्था आहे.पुस गावठाण ते तळणी गाडी रस्त्याची निवेदने देऊन ही मागील पन्नास वर्षांपासून दैना फिटेना,पक्का व मजबूत रस्ता व्हावा म्हणून आता ग्रामस्थांनी शासन आणि प्रशासनाला हात जोडून विनंती केली आहे.
शासकीय लालफितीच्या धोरणामुळे शासनाच्या ‘शेत तिथे पांदण रस्ता’ या योजनेची प्रभावी अंमलबजावणीच होत नाही.गेल्या वर्षीपासून पावसाने उसंत न घेतल्याने त्यात तर यावर्षी सातत्याने अतिवृष्टी होऊन आणखीनच भर पडली. आता शेतात जायचे कसे, शेतात निघालेले उत्पादन बाजारात न्यायचे कसे,असा फार मोठा यक्षप्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. तर नुकत्याच शाळा सुरू करण्यात आल्या पण,रस्ताच नसल्याने शाळेत जायचे कसे,कुणी आजारी पडले तर त्याला दवाखान्यात न्यायचे कसे असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. हे वास्तव अंबाजोगाई तालुक्यातील पुस गावठाण ते तळणी गाडी रस्त्याचे आहे.पावसाळ्याच्या दिवसात तालुक्यातील पांदण रस्ते चिखलमय झाल्याने शेतकर्यांना शेतात ये-जा करण्यासाठी त्रास सोसावा लागतो.पांदण रस्त्याच्या खडीकरणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून वारंवार करूनही अद्याप ही समस्या सुटलेली नाही. पांदण रस्त्यांच्या विकासासाठी कार्यक्रम आखला गेला नसल्याने पांदण रस्त्यांची दशा पालटू शकली नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी वडिलोपार्जित शेती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न शेतकरी करतात.तालुक्यातील तसेच गावांना जोडणार्या मुख्य रस्त्यांपासून शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते उपलब्ध आहेत.परंतू, देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली.तरी अद्याप ही या पांदण रस्त्यांची समस्या निकाली निघू नये, ही खरी शोकांतिका आहे.बीड जिल्ह्यातील पांदण रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी योजना राबविण्याचे अनुषंगाने वेळोवेळी ठराव घेण्यात आले असतील.तसेच हे ठराव पास करून शासनाकडे निधीची तरतूद करावी, यासाठी शिफारस ही करण्यात आली होती. परंतू,अद्याप ही निधी उपलब्ध न झाल्याने हा पांदण रस्त्याचा आराखडा कागदोपत्रीच राहिला,हे विशेष.पुस गावठाण ते तळणी गाडी रस्त्यासाठी तहसिलदार,पंचायत समिती,जिल्हा परिषद,पालकमंञी ते थेट मुख्यमंञी यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली अशी माहिती पुस गावचे सरपंच वसंतराव देशमुख यांनी दिली.तर सदरील रस्ता शेतकरी,शेतमजूर,ज्येष्ठ नागरीक,विद्यार्थी आणि महिलांचा ञास कमी करण्यासाठी तयार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. हा रस्ता तयार व्हावा ही सर्वच शेतकर्यांची मागणी आहे,रस्ता निर्मितीला कुणाचा ही विरोध नाही.रस्ता व्हावा यासाठी इथले अनेक शेतकरी हे आपली जमीन ही द्यायला तयार आहेत.तरी शासनाने याप्रश्नी आम्हाला न्याय द्यावा, मुख्यमंञी ग्राम सडक योजना, जिल्हा परीषद किंवा अन्य कोणत्याही योजनेतून निधी देवून हा रस्ता तात्काळ तयार करावा अशी अपेक्षा शेतकरी विश्वनाथ सावंत यांनी व्यक्त केली आहे.
Leave a comment