राज्यातील ३० जिल्ह्यांसाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजार मंजूर
बीड | वार्ताहर
यंदाच्या खरीप हंगामात बीड जिल्ह्यात सातत्याने ११ वेळेस झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे. खरीपाच्या सर्व क्षेत्रावरील शेत पिके पाण्याखाली गेल्याने हा हंगाम शेतकऱ्यांसाठी प्रचंड मोठ्या नुकसानीचे ठरला आहे. अशा स्थितीत हतबल शेतकऱ्यांना आता थोडाफार दिलासा मिळाला आहे. मार्च, एप्रिल व मे २०२१ या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी राज्यासाठी १२२ कोटी २६ लाख ३० हजारांचा मदत निधी शासनाने मंजूर केला आहे. यात बीड जिल्ह्याला गारपिटीच्या नुकसान भरपाईपोटी ५ कोटी ९० लाख ३० हजारांचा निधी मंजूर झाला आहे.लवकरच तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
याबाबतचा शासन निर्णयही आज ६ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोकण,पुणे, नाशिक,औरंगाबाद,अमरावती , नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये शेती व फळपिकांचे नुकसान झाल्यामुळे केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी दरानुसार मदत मागणी करून एकूण मदत देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
राज्यातील ३० जिल्ह्यांसाठी १२२ कोटी २६.३० लक्ष निधी नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय म्हणून वितरित केला जाणार आहे. यात बीड जिल्ह्याला गारपिटीच्या नुकसान भरपाईपोटी ५ कोटी ९० लाख ३० हजाराचा निधी मंजूर झाला आहे. प्रचलित पध्दतीनुसार कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार सर्व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप जिल्हाधिकारी यांना करावे असे निर्देश शासनाने दिले आहेत.
मंजूर झालेली रक्कम संबंधित बाधितांच्या बँक बचत खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचनाही शासनाने सर्व संबधित जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. पिकांच्या नुकसानीबाबत मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करु नये. यासाठी सहकार विभागाने योग्य ते आदेश निर्गमित करावेत. ज्या प्रयोजनासाठी हा निधी दिला आहे त्याच प्रयोजनासाठी त्याचा वापर होत आहे याची विभागीय आयुक्त यांनी खातरजमा करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत.
Leave a comment