नवे २२ रुग्ण तर २६ कोरोनामुक्त
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आलेली असली तरी मृत्यूसत्र मात्र कायम आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात कोरोनाने चौघांचा मृत्यू झाला, तशी नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. बुधवारी (दि.६) कोरोनाचे नवे २२ रुग्ण निष्पन्न झाले तर २६ जणांनी कोरोनावर मात केली.
जिल्ह्यात मंगळवारी १ हजार ९७६ संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल बुधवारी दुपारी मिळाले. यात १ हजार ९५४ निगेटिव्ह तर २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १, आष्टी ६, बीड व गेवराई तालुक्यात प्रत्येकी ४, माजलगाव तालुक्यात ३ तर पाटोदा व वडवणी तालुक्यातील प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान गत चोवीस तासात चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात लव्हूरी (ता.केज) येथील ७५ वर्षीय पुरुष, पाटोदा येथील ६३ वर्षीय महिला, काठवडा तांडा (ता.गेवराई) येथील ६० वर्षीय महिला व बेलुरा (ता.बीड) येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या एकूण रुग्ण मृत्यूची संख्या २ हजार ७७८ इतकी झाली.तसेच बुधवारी दिवसभरात २६ जणांनी कोरोनावर मात केल्याने आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९९ हजार ८७० झाली आहे.
दरम्यान जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता १ लाख २ हजार ८८८ इतकी झाली असून सध्या जिल्ह्यात केवळ २४० रुग्ण उपचाराखाली आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी लोकप्रश्नशी बोलताना दिली.
Leave a comment