सौताडा-बीड चौपदरीकरणासाठी 135 कोटींचा निधी
नगरमध्ये नितीन गडकरी यांची घोषणा
बीडहून नगरला जाण्यासाठी तीन ते चार राज्य आणि महामार्ग असतानाही चांगले रस्ते नसल्याने बीड ते नगर हे अंतर कापण्यासाठी मोठा वेळ जातो. यापूर्वीच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नगर ते पुणे या दरम्यान फ्लायओव्हर महामार्गाची घोषणा केली आहे. त्यानंतर नगर-ते जामखेड आणि सौताडा ते बीड असा चौपदरी महामार्ग प्रस्तावित करण्यात आला असून सौताडा ते बीड या रस्ता लिंकसाठी 135 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतुक मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यानंतर गत पाच वर्षाच्या काळात बीड जिल्ह्याला जवळपास आठ महामार्ग दिले. याचा सर्वात मोठा फायदा अंबाजोगाइ-परळी शहरांना झाला. त्यानंतर पालखी मार्गही जिल्ह्यातून गेले. आता सौताडा ते बीड या महामार्गाच्या कामासाठी गडकरींनी परवानगी दिली असून आगामी काळात बीड-नगर रस्त्याची दैना फिटणार आहे.
शनिवारी नगरमध्ये केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते 4 हजार 75 कोटी रुपये किमतीच्या आणि 527 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. याप्रसंगी गडकरी यांनी तीन नवीन नवीन प्रकल्पांची घोषणा केली.यामध्ये तळेगाव, चाकण, शिक्रापूर, नावरा, श्रीगोंदा, जामखेड-सौताडा ते बीड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 च्या 135 कोटी रुपयाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. हाच महामार्ग दौंड जवळच्या रेल्वे जवळून जात असल्याने निम्हनगाव येथे रेल्वेचा पूल बांधण्यास त्यांनी मंजुरी दिली. तसेच कोपरगाव ते सावळीविहीर या येवला-शिर्डी रस्त्याच्या 150 कोटी रुपयाच्या कामाला त्यांनी मंजुरी दिली.यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी सुरतहुन निघणार्या ग्रीन कॉरिडोर सुरत-नाशिक-अहमदनगर-नाशिक ग्रीन फिल्ड रस्त्याची घोषणा केली.
हा रस्ता अहमदनगर जिल्ह्यातून जात आहे. सुरत ते चेन्नईपर्यंत जाणार जाणार आहे. मुंबई-पुणे पेक्षा हा 3 पट रुंद आहे. जिल्ह्यात 180 किमी लांबीच्या आहे. या रस्त्यासाठी केवळ अहमदनगर जिल्ह्यात 8000 कोटी रुपये खर्च होणार असून राज्यात या रस्त्याची एकूण लांबी 481 किमी आहे असेही त्यांनी सांगितले.राज्यात तयार होणार्या रस्त्याच्या बाजूला राज्य सरकारने पडीक असलेली जागा दिल्यास त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क यासह इतर गोष्टी केल्या जाऊ शकतात असेही ते म्हणाले. अहमदनगर-पुणे रस्त्यावर होणार्या वाहतूक कोंडी संदर्भात वाघोली ते शिरूर या येथील ब्रिजचे डिझाईन तयार आहे.राज्य सरकारने त्यासाठी लागणारी जीएसटी आणि रॉयल्टी माफ करावी अशी मागणी त्यांनी यावेळी राज्य सरकारकडे केली.यावेळी व्यासपीठावर नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ,खासदार डॉ सुजय विखे,खासदार सदाशिव लोखंडे, आमदार रोहित पवार, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण काका जगताप, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
विकासासाठी पाणी, वीज, वाहतूक आणि संपर्क महत्वाचा-गडकरी
मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन
देशाच्या विकासात 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाणी, वीज, वाहतूक आणि संपर्क. देशात उद्योग आणायचे असतील, तर उद्योग सुरू व्हायच्या आधी उद्योजक या चार गोष्टी बघतो. उद्योग आला, तर भांडवली गुंतवणूक येते आणि त्यानंतर रोजगार उपलब्ध होतो. गरीबाला जात-धर्म नसतो. त्यामुळे देशातली गरिबी, बेरोजगारी दूर करायची असेल, मजूर-शेतकर्यांचं कल्याण करायचं असेल तर रोजगाराची निर्मिती करावी लागेल. त्यासाठी या 4 गोष्टींची व्यवस्था करावी लागेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नगर येथे शनिवारी (दि.2) केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. शरद पवारांनी देशाच्या रस्ते वाहतुकीच्या विकासामध्ये नितीन गडकरींच्या योगदानाबद्दल त्यांचं कौतुक केल्यानंतर नितीन गडकरींनी चांगल्या रस्त्यांचं महत्त्व सांगताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचं एक वाक्य सांगितलं. शिवाय, देशाच्या विकासात महत्त्वाच्या असलेल्या 4 गोष्टींपैकी रस्ते हा एक घटक असल्याचं देखील गडकरींनी यावेळी नमूद केलं.
यावेळी चांगल्या रस्त्यांविषयी बोलताना गडकरींनी ते महाराष्ट्रात मंत्री असतानाची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, राज्यात मंत्री असताना तेव्हा माझे सचिव असलेल्या तांबेंनी मला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचं एक प्रसिद्ध वाक्य सांगितलं होतं. ते वाक्य होतं ‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले झालेले नाहीत. अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाली’. राष्ट्रीय महामार्गातून सगळ्यात जास्त निधी नगर जिल्ह्याला मिळालाय असं मी ऐकलं. पण मी ज्या ज्या जिल्ह्यात जातो, तिथला खासदार हेच सांगत असतो. आणि ज्या राज्यात जातो, तिथला मुख्यमंत्री म्हणतो की सगळ्यात जास्त आम्हाला मिळालंय असं देखील गडकरी यावेळी मिश्किलपणे म्हणाले.दरम्यान, नागपूरमधील साखर कारखानदारीच्या अवस्थेवरून देखील नितीन गडकरींनी यावेळी केलेल्या मिश्किल टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये हास्याचे लकेर उमटली. काल मी आमच्या केंद्रातल्या अधिकार्यांना सांगितलं की आमच्याकडे टिश्यू कल्चरचा ऊस लागतो. कारखानदारी म्हणायचं तर कोल्हापूरची साखर कारखानदारी मेरीटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा वाटते, मराठवाडा म्हणजे फर्स्टक्लासमधल्या विद्यार्थ्यांची शाळा आणि विदर्भ म्हणजे ज्यांना 100 पैकी 20 पेक्षा कमी गुण मिळालेत त्यांची शाळा. पण आता आम्ही 50 नर्सरी तयार केल्या आहेत. त्यातून शेतकर्यांना रोपं मिळायला लागली आहेत, असं गडकरी म्हणाले.
Leave a comment