पाटोदा, केज तालुक्यातील घटनेने सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
गंभीर गुन्हे रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान
बीड । वार्ताहर
गंभीर गुन्हे घडू नयेत यासाठी पोलीसांकडून केल्या जाणार्या प्रतिबंधात्मक उपाययोजना योग्यवेळी झाल्या तर मोठ्या घटना आणि गुन्हे टळू शकतात. बीड जिल्ह्यात मात्र दिवसेंदिवस कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली असल्याचे गंभीर गुन्ह्यांच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. जिल्ह्यात चालु वर्षाच्या आठ महिन्यात खूनाच्या 36 घटना घडल्या. तर सप्टेंबरमध्ये पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे पारधी वस्तीवर जमावाकडून झालेल्या मारहाणीत आजोबा नातवाचा मृत्यू झाला. यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ताजी असतांना केज तालुक्यातील हनुमंत पिंप्री येथे चोर समजुन जमावाने केलेल्या मारहाणीत एका 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी केज ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. असे असतांनाच जानेवारी ते ऑगस्ट 2021 या कालावधीत 107 जणांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या. यातील 106 गुन्हे निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था किती अबाधित आहे. याची प्रचिती या आकडेवारीवरुन येते.
बीड जिल्ह्याकडे सातत्याने संवेदनशिल जिल्हा म्हणून पाहिले जाते. शिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक आणि त्यांच्याकडून होणारे गुन्हे यामुळे पोलीस यंत्रणेसमोरील आव्हाने कायम राहतात. छोट्या-मोठ्या कारणावरुन वाढत जाणारे वैराची भावना एखाद्याचे जीवन संपवते. जमीन, जागा आणि संपत्तीच्या वादातून खूनाचे गुन्हे घडतात. यामुळे अनेक कुटूंबे आधारहीन होतात. अशाच घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. जानेवारी ते ऑगस्ट 2021 या आठ महिन्यात जिल्ह्यात खूनाचे तब्बल 36 गुन्हे दाखल झाले. पोलीस तपासात हे सर्व गुन्हे निष्पन्न झाले. याबरोबरच खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी 107 गुन्हे दाखल झाले. यातील 106 गुन्हे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. दरम्यान 2020 मध्येही जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात खूनाचे 35 गुन्हे दाखल झोले होते तर जानेवारी ते डिसेंबर 2020 या कालावधीत याच गुन्ह्यांची संख्या वाढून वर्षभरात खूनाचे तब्बल 53 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले. यातील 47 गुन्हे तपासाअंती निष्पन्न झाले होते तर जानेवारी ते डिसेंबर 2020 या कालावधीत प्राणघातक हल्ल्याच्या 150 घटना घडल्या होत्या. हे सर्व गुन्हे तपासाअंती निष्पन्न झाले होते. एकंदरच गेल्या दीड ते दोन वर्षातील गंभीर गुन्ह्यातील ही आकडेवारी लक्षात घेतली तर गुन्हा घडल्यानंतर आरोपीला निष्पन्न करण्यापर्यंत तपास होतांना दिसतो. मात्र गुन्हा घडू नये यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यापर्यंत यंत्रणेला यश येत नाही हेच यातून दिसुन येते. नुकताच पाटोदा आणि केज तालुक्यात तिघांचे खून झाले आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Leave a comment