संजय उपाध्याय यांची माघार; रजनीताईंचा मार्ग मोकळा

 

बीड | वार्ताहर

 

बीड जिल्ह्याला आणखी एक खासदार मिळण्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे. कारण भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी या निवडणूकीत महाराष्ट्राच्या परंपरेला धरुन आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या उमेदवार रजनीताई अशोक पाटील या खासदार होणार आहेत. त्यांच्या रुपाने बीड जिल्ह्याला खासदारकी मिळणार आहे.यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंद व्यक्त केला जात आहे.

 

राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भाजपाने  या निवडणुकीसाठी संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. मात्र, महाराष्ट्राच्या परंपरेनुसार ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत आणि राज्याची परंपरा कायम राहावी, यासाठी भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने माघार घ्यावी, असे आवाहन केले होते.

 

 

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून एखाद्या नेत्याच्या निधनामुळे होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे, याचा उल्लेख काँग्रेस नेत्यांनी चर्चेत केला. काँग्रेस नेत्यांच्या आवाहनाचा विचार करून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी विचारविनिमय केला आणि भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा असा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या काँग्रेस नेत्या रजनीताई पाटील यांचे अभिनंदन केले.

 

रजनीताई पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष भाजपाला महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला देत म्हटलं होतं की, आत्तापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, तेव्हा आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. पण मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. दरम्यान, भाजपाने परंपरा कायम राखत अर्ज माघारी घेण्याचा निर्णय घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.  

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.