पालकमंत्री मुंडेंना भविष्यात येवू शकते अडचण
माजलगाव । उमेश जेथलिया
माजलगाव पंचायत समितीच्या 3 वर्षांपासून रखडलेल्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास शेवटी मराठवाडा मुक्ती दिनी मुहूर्त साधला असून या प्रशासकीय कार्यक्रमास सभापती पतींनी राजकीय स्वरूप देत लोकप्रतिनिधी व्यतिरिक्त राजकीय प्रतिनिधींना अग्रगण्य स्थान दिले असून हा कार्यक्रम प्रशासकीय न राहता राजकीय केला आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सभापती सोनाली खुळे यांचे पती भागवत खुळे यांनी हा कार्यक्रम हायजॅक करत खोडसाळपणा केला आहे. आगामी निवडणूकीत काय होईल हे आज सांगता येत नाही. मात्र लोकप्रतिनिधीसमोर आपणच हिरो असल्याचा बनाव ते करू लागले आहे. कम्प्लिशन सर्टिफिकेट नसल्याने या इमारतीचे लोकार्पण शासकीय नियमानुसार करता येत नाही. याची उद्या विरोधकांनी तक्रार केली तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांना ते अडचणीचे होवू शकते अशी ही चर्चा होत आहे.
भाजप आमदार आर.टी.देशमुख यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे भांडून पं.स.च्या प्रशासकीय इमारतीला निधी मिळवून दिला होता. भाजपच्या काळात मिळालेल्या निधीवर ही प्रशाकीय इमारत होत असून त्याचा लोकार्पण सोहळा आज होत आहे. या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आ प्रकाश सोळंके राहणार आहेत. सोबतच जिल्ह्यातील इतर आमदार सोबतच इतर राजकीय लोकांना या प्रशासकीय कार्यक्रमात स्थान दिल्यामुळे पं.स.च्या आवारात एकच चर्चेला उधाण आले आहे. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सभापती पतींनी घाई घाईत केवळ इमारतीच्या सांगाड्याचे लोकार्पण करण्याच्या हेतूने कार्यालयात फर्निचरची व्यवस्था नसताना लोकार्पण करण्याचा घाट घातला आहे.
कम्प्लिशन प्रमाणपत्राचा प्रस्तावच नाही
पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. बांधकाम खात्याकडून ही इमारत पंचायत समितीकडे वर्ग करतांना कम्प्लिशन सर्टिफिकेटची आवश्यकता असते. हे सर्टिफिकेट मिळावे यासाठी तसा प्रस्तावच बांधकाम विभागाकडे आला नसल्याचे न.प.चे अभियंता जोगदंड यांनी लोकप्रश्नशी बोलतांना सांगितले.
Leave a comment