आता देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी मोठी बातमी... एनडीए म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची दारं आता मुलींसाठीही खुली होणार.. एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींनाही देता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील मुलींना मोठा दिलासा दिलाय. ५ सप्टेंबरला एनडीएची प्रवेश परीक्षा आहे आणि पहिल्यांदाच मुलींनाही ही परीक्षा देता येणार आहे.
भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगणाऱ्या मुलींसाठी आनंदाची बातमी आहे. पाच सप्टेंबर रोजी होणारी एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा आता मुलींनाही देता येणार आहे. सर्वोच्च न्यायालायने आज, बुधवारी याबाबतचा निर्णय दिला आहे. महिलांना दिल्या जाणाऱ्या संधीचा विरोध केल्यामुळे कोर्टाने भारतीय सेनादलाला फटकारले आहे. त्यासोबतच तुमचा दृष्टीकोन बदला, असा सल्लाही दिला. न्यायमुर्ती जस्टिस संजय किशन कौल आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने बुधवारी हा महत्वाचा निर्णय दिला. एनडीएमध्ये महिलांना संधी देण्यात यावी, अशी कुश कालरा यांनी याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी झाली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी परीक्षेसाठी अर्ज मागविले होते. 5 सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. एन. डी. एची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इ. ११वी व १२ वीचा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपर मध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मार्फत मुलाखती साठी बोलावले जाते.
शैक्षणिक पात्रता:
एन. डी. ए. मध्ये दाखल होतांना उमेदवार १२ वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी १२ वीत शिकत असावा अथवा १२ वी उत्तीर्ण असावा. एन.डी.ए. च्या आर्मी शाखेसाठी उमेदवार १२ वी च्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा. आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवारने १२ वी ला गणित व भौतिकशास्त्र (Maths आणि Physics) हे विषय घेतलेले असावे.
वयोमर्यादा:
एन. डी. ए. मध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय- साडेसोळा ते साडेएकोणवीस (Sixteen and Half to Nineteen and Half) दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया:
एन. डी. एमध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय.
Leave a comment