“जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटकेची शक्यता”

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन घोटाळा प्रकरमात मोठा दणका बसला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. गिरीश चौधरी यांची या प्रकरणी मंगळवारी कसून चौकशी करण्यात आली. तब्बल १३ तास चौकशी केल्यानंतर ईडीने गिरीश चौधरी यांना ताब्यात घेतलं. ईडीला सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

या प्रकरणी जानेवारी महिन्यात एकनाथ खडसे यांची ईडीने चौकशी केली होती. खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावलं होतं. यानंतर त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. काल दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ईडीने अटक केली आहे.

 

पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली. ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती.

 

अंजली दमानियांकडून चौकशीची मागणी

दरम्यान, ईडीने पीएमएल अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्याची गरज असते, अनेक शेल (डबा) कंपनी यांच्याकडून गिरीश चौधरी आणि मंदाकिनी खडसे यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, त्याची लिंक कुठे आहे, ते शोधलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी व्यक्त केली.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा?

एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत भोसरीत जमीन खरेदी केल्याचा आरोप करण्यात आले आहेत. भाजपचं कमळ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनाही ईडीने नोटीस धाडली होती. भाजप-शिवसेनेच्या सत्तेत महसूलमंत्री पदी असताना भोसरी एमआयडीसीत खरेदी केलेल्या जमीनीचा व्यवहार यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे. खडसेंनी पत्नी मंदाकिनी यांच्या नावाने तीन कोटी 75 लाखांना तीन एकर जमिनीचा व्यवहार केला होता. पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद करण्यासाठी 1 कोटी 37 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी ही भरण्यात आली होती. कोलकाता येथील उकानी आणि मंदाकिनी खडसे यांच्यात हा व्यवहार झाल्याचं दाखविण्यात आल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. 2014 मध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आणि एकनाथ खडसेंच्या पदरी महसूल खातं आलं. त्यानंतर 28 एप्रिल 2016 मध्ये खडसेंचा याच भोसरी एमआयडीसीत पत्नीच्या नावे जमीन व्यवहार झाला. पण तत्पूर्वीच इथं अनेक कंपन्याचं काम सुरु होतं. मग हा व्यवहार कसा काय झाला? असा प्रश्न 30 मे 2016 साली तक्रारदार हेमंत गावंडेनी उपस्थित केला होता आणि तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे अडचणीत आले होते. 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही सामाजिक संघटनांनी याप्रकरणी एकनाथ खडसेंना चांगलंच घेरलं. परिणामी खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 4 जून 2016 ला एकनाथ खडसेंनी सर्व मंत्री पदाचा राजीनामा दिला. खडसेंकडे त्यावेळी महसूल, कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मत्स्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ मंत्री अशी खाती होती. खडसेंनी राजीनामा देताच तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी न्यायमूर्ती झोटिंग यांची एक सदस्यीय समितीची स्थापना केली.

झोटिंग समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करणं अपेक्षित होतं. फेब्रुवारी 2017मध्ये नागपूरला जाऊन खडसे या समितीसमोर हजरही झाले. मात्र तरीही अहवाल सादर होण्यात सातत्याने चालढकल सुरूच होती. शेवटी उच्च न्यायालयाने फटकारले आणि एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

पुणे सत्र न्यायालयात सुनावणी सुरु असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुरावे आढळून येत नसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान 2019 मध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि अनपेक्षितपणे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. भाजपच्या हातून सत्ता जाण्याला आणि पक्षात माझी मुस्कटदाबी करण्याला एकमेव फडणवीस जबाबदार आहेत, असा ठपका ठेवत खडसेंनी कमळ सोडून हाती राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ घेतलं. या प्रवेशाला दोन महिने उलटताच खडसेंना ईडीने नोटीस धाडली होती. आता याचप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली आहे. 

राष्ट्रवादी पक्षप्रवेशावेळी काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

भाजप सोडून राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, "दिल्लीतील वरीष्ठांनी राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला. माझ्यावर विनयभंगाचा खटला टाकला, आयुष्याची चार वर्षे वाया घालवली. भूखंडाच्या चौकश्या लावल्या, जयंतराव कोणी किती भूखंड घेतले आता सांगतो. मी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, पक्षाचे काम करत राहणार. भाजप जशी वाढवली त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवून दाखवणार. जयंतराव मला बोलले तुम्ही राष्ट्रवादीत आले, तर ईडी बिडी लावतील तर मी बोललो मी सीडी लावीन. समोरासमोर संघर्ष केला, पाठीत खंजीर खुपसला नाही. आयुष्यातील चाळीस वर्षे भाजपमध्ये काम केलं. स्वाभाविक आहे जिथे 40 वर्ष राहिलो एकाएकी पक्ष कसा सोडायचं असं वाटत होतं. माझी किती मानहानी झाली, छळवणूक झाली हे सांगितलं."

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.