घरे अन् फ्लॅटच्या अमिषाने 90 लाखांचा गंडा
’मेरिट लँड मार्कस्’कंपनीच्या चेअरमन,संचालकांवर गुन्हा
बीड । वार्ताहर
पतसंस्था, मल्टिस्टेट संस्थांनी ठेवीदारांना जादा व्याजाचे अमिष दाखवून कोट्यवधींना गंडवल्याचे प्रकरण जिल्ह्यात घडलेले असतानाच आता पुण्यातील ‘मेरिट लँड मार्कस्’ या कंपनीने हप्तेवारीने स्वस्तात भूखंड अन् फ्लॅट देण्याचे तसेच पाच वर्षांत दामदुप्पट रक्कमेचे अमिष दाखवून तब्बल 90 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. महत्वाचे म्हणजे रक्कमा भरुन मुदत संपल्यानंतरही घर अन् फ्लॅट न मिळाल्याने ठेवीदारांना फसगत झाल्याचा संशय आला अन् अखेर तीन वर्षांच्या कालावधीनंतर या प्रकरणात शनिवारी (दि.3) बीड शहर ठाण्यात कंपनीच्या चेअरमनसह संचालक अशा चौघांवर गुन्हा नोंद झाला.
स्वस्तात घरे मिळवून देण्याचे दिवास्वप्न दाखवून या कंपनीच्या लोकांनी बीड जिल्ह्यातील शंभरहून अधिक ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील ठेवीदार भाऊसाहेब बापूराव गळगटे यांनी याबाबत शहर ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पुण्यातील मेरिट लँड मार्कस् कंपनीने 2014 मध्ये बीड शहरातील जालना रोडवरील लक्ष्मी संकुल येथे शाखा सुरु केली होती. गुंतवणूकदारांना घराचे तसेच प्लॉटचे स्वप्न दाखवून तीन वर्षांपर्यंत कमीतकमी एक हजार रुपयांपासून मासिक, तिमाही, सहामाही व वार्षिक हप्ते भरायला सांगितले. पैसे भरल्यानंतर कंपनीचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे सांगत गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. इतकेच नाही तर या हप्तेवारीने भरलेल्या रक्कमेच्या मोबदल्यात घर किंवा प्लॉट देण्याचे आमिष दाखविले. तसेच पाच वर्षांत दामदुप्पट रक्कमेचे आमिषही दाखविले. अशा पध्दतीने शेकडो ठेवीदारांनी मेरिट लँड मार्कस् लि.पुणे या कंपनीने लाखोंच्या ठेवी गोळा केल्या. मात्र त्यानंतर ही मुदत पूर्ण झाल्यावरही गुंतवणूकदारांना फ्लॅट किंवा प्लॉट तर मिळालेच नाही शिवाय दामदुप्पट तर दूरच मुद्दलही परत मिळाली नाही. या फिर्यादीनुसार शंभरहून अधिक ठेवीदारांची कंपनीने 89 लाख 94 हजार 400 रुपयांची फसवणूक केली आहे.
चार वर्षांनंतर चौघांवर गुन्हा
भाऊसाहेब गळगटे यांनी या प्रकरणात सर्वप्रथम बीड शहर ठाण्यात तक्रार नोंदवली. दरम्यान त्यांच्या प्रमाणे शेकडो गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पत्रव्यवहार व पाठपुरावा करण्यात तीन वर्षे गेली. शहर ठाण्याच्या पोलिसांनी गांभीर्य ओळखून वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला. 2017 च्या प्रकरणात अखेर चार वर्षांनंतर पोलीस अधीक्षक आर.राजा,अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांनी लक्ष घातल्यानंतर शनिवारी (दि.3) शहर ठाण्यात कंपनीचा चेअरमन महेश प्रकाश मुंगशे, संचालक सुरेश भानुदास जाधव, किरण प्रकाश आटपालकर, महादेव विश्वनाथ साळुंके या चौकडीवर संगणमताने फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधि.1999 चे कलम 3 व 4 नुसार गुन्हा नोंद झाला. पोलीस निरीक्षक रवि सानप हे तपास करत आहेत.
शाखाही बंद;अधिकारीही फरार!
बीडच्या जालना रोडवर सुरु करण्यात आलेल्या या कंपनीने तीन वर्षांनंतर 2017 मध्ये रात्रीतून गाशा गुंडाळला. कंपनीची शाखाही बंद झाली, त्यामुळे ठेवीदारांना धक्का बसला. त्यांनी कंपनीकडे वारंवार संपर्क केला मात्र कंपनीच्या अधिकार्यांनी हात वर केले. चेअरमन व संचालक देखील गायब झाले. त्यामुळे ठेवीदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. नंतर त्यांनी पोलीसात धाव घेतली.
फसवणूकीचा आकडा वाढणार!
घरे व प्लॉटच्या नावाखाली फसवणूक करणार्या मेरिट लँड मार्कस् कंपनीवर गुन्हा नोंद झाल्यानंतर शंभर ठेवीदार तक्रार देण्यासाठी समोर आले असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. दरम्यान तक्रारदार ठेवीदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने फसवणुकीचा आकडा एक कोटीच्या घरात जाण्याचा अंदाज आहे.
तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार
पुणे स्थित ‘मेरिट लँड मार्कस्’ कंपनीने गुंतवणूकदारांना 90 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौकशी करुन या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार करुन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याचा विचार सुरु आहे अशी माहिती उपअधीक्षक संतोष वाळके यांनी दिली.
Leave a comment