रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत खा.प्रितमताईंचे निर्देश
आष्टी । वार्ताहर
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या प्रगतीमध्ये अडचण ठरणार्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी आष्टी तहसील कार्यालयात रेल्वे व जिल्हा प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक घेतली.प्रकल्प निर्मिती मध्ये येणार्या अडचणी आणि शेतकर्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कालबद्ध योजना राबवण्याच्या सूचना देऊन पुढील पंधरा दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.
बीड जिल्ह्याचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे सातत्याने प्रयत्नशील आहेत,आष्टी तहसील कार्यालयाच्या बैठकीत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाने आपापसात समन्वय राखावा,रेल्वे प्रकल्प माझ्या आणि संपूर्ण जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे,यात बेजबाबदारपणा खपवून घेणार नाही’ अशा शब्दात त्यांनी अधिकार्यांना फटकारले. बैठकीला उपस्थित शेतकर्यांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांनी अधिकार्यांना सूचना केल्या.रेल्वे,भूमी अभिलेख आणि कृषी विभागाने त्यांच्या तक्रारींचे विभागनिहाय वर्गीकरण करावे व संबंधित गावांना भेटी देऊन त्यांच्या समस्या पंधरा दिवसांमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करावा,यासंदर्भात एक अहवाल तयात करून सादर करण्याचे ही त्यांनी सांगितले.बैठकीला आ.बाळासाहेब आजबे,मा.आ.भीमसेन धोंडे,विजय गोल्हार,सविता गोल्हार,सुवर्णा लांबरूड,शंकर देशमुख,वाल्मिक निकाळजे,रामदास बडे,शैलजा गर्जे यांच्यासह लोकप्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.
संयम बाळगा,अधिकारी तुमच्या गावात येतील
बैठकी दरम्यान शेतकर्यांनी मावेजा,अतिरिक्त भूसंपादन आणि इतर समस्यांविषयी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी खा.प्रितमताईंनी त्यांच्याशी संवाद साधला.शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, संयम बाळगा पुढील पंधरा दिवसांमध्ये सर्व अधिकारी संबंधित गावांना भेटी देणार आहेत,त्यावेळी तुमच्या समस्या मार्गी लागतील.अधिकार्यांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन केले नाही तर माझ्याशी संपर्क करा असे म्हणत उपस्थित शेतकर्यांना त्यांनी आश्वस्त केले.
Leave a comment