बीडमध्ये आ.धस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा एल्गार
बीड । वार्ताहर
महाविकास आघाडी सरकारच्या गलथानपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण गेले. मराठा समाजाच्या पिढ्या बरबाद झाल्या. आरक्षण मिळेपर्यंत विद्यार्थ्यांची फी तरी भरा, स्थगितीपुर्वीच्या नियुक्त्या द्या अशी मागणी करत आ.सुरेश धस यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली. हे सरकार फक्त घोषणा करतयं. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत हे तारखावर तारखा वाढवित गेले आणि त्यातूनच हे आरक्षण गेले. दोन वर्षात या सरकारने सर्व सवलती बंद केल्या. सर्वांची वाट लावली असा आरोप आ. सुरेश धस यांनी बीड येथे केला.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, जिल्ह्यातील शेतकर्यांना उद्दिष्टाप्रमाणे 1600 कोटींचे पीककर्ज वितरित करावे,ऊसतोडणी कामगारांना 66 टक्के दरवाढ व संरक्षणासाठी संघटित कामगारांप्रमाणे कायदा करावा,कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांना कायमस्वरुपी सेवेत घ्यावे या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (दि.28) आ. सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या मोर्चाला सुरुवात झाली. सुभाष रोड, माळीवेस, टिळक रोड, कारंजा, बशीरगंजमार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहचला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करत नंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आ.लक्ष्मण पवार, माजी आ.आर.टी.देशमुख यांच्यास मान्यवर व समाजबांधव हजारोंच्या संख्येनेसहभागी झाले होते.
कोणीही मोर्चे काढल्यावर लोक येत नाहीत,त्यासाठी रोज लोकात रहावं लागतं. लोकांना कोविड सेंटरला जाऊन आधार द्यावा लागतो अशी टिप्पणी करत आ.धस यांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार कपट कारस्थानाने सत्तेत आलेले सरकार आहे. ज्या देवेंद्र फडणविसांना साडेतीन टक्के म्हणून हिणवलं, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्यांचे अभिनंदन करणे सोडून काहींनी फडणवीस यांच्यावर फेक अकाउंट वरुन टिका केली. कंगणाच घरं पाडता, आ.मेटेंच्या कार्यक्रमात गोंधळ घालता, विचार दाबण्याचा हा प्रकार असल्याची टिका करत आ. सुरेश धस म्हणाले, पंधरा पंधरा दिवस अर्धा तालुका अंधारातय, मावेजासाठी शेतकरी जाळुन घेतोय,ना मावेजा मिळतोय ना कोणाला अटक होते,मग मोर्चे काढायचे नाहित तर काय यांच्या पाया पडायचे का? तुम्ही कोरानामुळे झालेले बळीसुध्दा लपवताय. म्युकरमायकोसीस वाढतोय सरकारचं लक्ष कुठय? असा सवालही त्यांनी केला. कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांना नियम अन् मंत्र्यांच्या कार्यक्रमाला जोरदार गर्दी यांना चालते.पटोलेंच्या कार्यक्रमाला गर्दी, राष्ट्रवादीचा परिसंवाद, सेनेचे कार्यक्रम सुरु आहेत. म्हणजे यांना कोणालाच कोरोना नाही, फक्त अधिवेशनातच कोरोना होतो का? हे सरकार फक्त घोषणा करतय. रेमडीसेविर 35 हजारापेक्षा कमी मिळाल का? असा सवाल त्यांनी केला. मावेजा न मिळाल्याने बीडमध्ये एका शेतकर्याने जाळून घेवून आत्महत्या केली. तरीही या प्रकरणातील एकाही अधिकार्याला अटक झाली नाही. माणसं जळून मरु लागली तरी प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही. या अशा प्रशासनाचे करायचे तरी काय? असा प्रश्नही त्यांनी केला. दरम्यान मोर्चाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आ.सुरेश धस यांनी आभार मानले.
याप्रसंगी आ.लक्ष्मण पवार म्हणाले, या सरकारच्या काळात मराठा,ओबिसींचे आरक्षण गेले आहे. मराठा समाजाला आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. बीड जिल्हयासाठी मराठवाडा वॉटरग्रीड योजना मागच्या सरकारने दिली होती, पण या सरकारने ती योजनाही गायब केली. सरकारला फक्त वसुलीचे पडले आहे असेही आ. पवार म्हणाले. माजी आ.आर.टी.देशमुख यांनी यावेळी आ.धसांचा उल्लेख झुंजार नेतृत्व असा करत अठरा पगड जाती जमातीला न्याय देण्यासाठी हा मोर्चा असुन त्यात आ.धस यांना नक्कीच यश मिळेल अस सांगत आ.धस यांच्यासाठी प्राणाची बाजी लाऊ असा शब्द दिला. या मोर्चात मिरा गांधले, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी.बी जाधव, उसतोड कामगार संघटनेचे सुग्रीव सानप,अभिजित शेंडगे, यांच्यासह गंगाधर काळकुटे,सचिन उबाळे, संभाजी सुर्वे यांची समयोचित भाषणे झाली. मोर्चा दरम्यान मुस्लिम समाज बांधवांकडून कारंजा परिसरात पुष्पवृष्टी करत मोर्चेकर्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच एमआयएमचे जिल्हाध्यक्ष र्अड. शेख शफीक व पदाधिकार्यांच्या वतीने मोर्चेकर्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.
राष्ट्रवादीवर जोरदार टिका
फुलेे-शाहू, आंबेडकरांचे नाव घेता अन् डान्सबारकडून पैसैे घेता?
आ.सुरेश धस यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टिका केली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना विरोध म्हणून पापाने सत्तेत आलेले अन् सचिन वाझेला 100 कोटी मागायला लावणारे हे सरकार आहे. आता स्व.आर.आर.पाटील स्वर्गात काय म्हणत असतील? कुणासं ठाऊक, सावकाराला कोपरापासून ढोपरापर्यंत झोडू अशी कार्यप्रणाली ठेवलेल्या आर.आर.पाटलांनी डान्सबार बंद केले होते, स्वच्छता मोहिम राबवली होती. एकापेक्षा एक चांगले निर्णय त्यांनी गृहमंत्री असताना घेतले. अन् आता त्यांच्याच पक्षात असे उद्योग करणारे जमले. डान्सबारवाल्याकडून पैसे मागणारी ‘औलाद’ गृहमंत्री कशी राहिल, मालच माल छापला. फुलेे-शाहू, आंबेडकरांचे नाव घेता अन् डान्सबारकडून पैसैे घेता? हे चालत नसते असेही आ.धस म्हणाले.
शरद पवार साहेब नेमके करतात काय?
मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावण्याचे काम महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील आयोग बोगस आहे असे ते म्हणातात, सरकारचे प्रमुख शरद पवार साहेब यावेळी नेमके करतात काय? असा सवाल करत वास्तविक मंत्री वडेट्टीवार हेच बोगस अन् फंटुश मंत्री आहेत. त्यांनी आता बीड जिल्ह्यात येवूनच दाखवावे असे आव्हानही आ.धस यांनी दिले.
बीड जिल्हा रग असलेला!
कोणी यावं अन् टिकली मारुन जावं असा हा जिल्हा नाही. रग असलेला बीड जिल्हा आहे, त्यामुळे कोणीही ओवाळून टाकलेल्या अधिकार्यांनी आम्हाला सल्ला देवू नये, त्यापेक्षा आमच्या जिल्ह्यातील नागरिकांची कामे मार्गी लावून त्यांना न्याय द्यावा. जिल्हाधिकार्यांनीही हे असले काम न करणारे अधिकारी जिल्ह्यातून हाकलून द्यावेत अशी मागणी आ.धस यांनी केली.
मोर्चातून मांडल्या या प्रमुख मागण्या
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आवश्यक ती कारवाई करावी व मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यावे. बीड जिल्ह्यातील शेतकर्यांना उद्दिष्टाप्रमाणे 1600 कोटी रुपये पीककर्ज वाटप करावे.ऊसतोडणी कामगारांना 70 टक्के भाववाढ मिळावी व त्यांच्या संरक्षणासाठी संघटीत कामगारांप्रमाणे त्यांच्यासाठी कायदा करण्यात यावा.कोविड-19 या साथ रोगाच्या लढ्यामध्ये सक्रीय कामगिरी बजावलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांना सेवेत कायम करण्यात यावे.कोविड-19 प्रादुर्भावामुळे मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना अर्थसहाय्य करावे.आष्टी, पाटोदा, अंबाजोगाई या तालुक्यांमधील मागील वर्षीच्या अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी. बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, वडवणी, धारूर, अंबाजोगाई आणि केज या तालुक्यांमध्ये विविध योजनांमधील घरकुल लाभार्थ्यांसाठी वाळु घाटांचा लिलाव करावा.रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, रस्ते तसेच गाव, पाझर तलाव, लघु-मध्यम-मोठे जलसिंचन प्रकल्प यासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मावेजा तात्काळ देण्यात यावा तसेच भूसंपादन विषयक प्रलंबित प्रश्न सोडवण्यात यावेतमहात्मा फुले कर्जमाफी योजनेत थकीत कर्जदारांची कर्जमाफी केली, मात्र नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना 50 हजार बक्षीस देण्याची घोषणा हवेतच राहिली असून त्या कर्जदारांना सरकारने तात्काळ न्याय द्यावा. जिल्ह्यातील वृत्तपत्रांची शासनाच्या विविध विभागांकडील व भूसंपादन जाहिरातीची थकीत देयके तात्काळ देण्यात यावीत.महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात मयत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत करावी. या सर्व मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
बीड: आ.सुरेश धस व आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वात निघालेल्या मराठा आरक्षण मोर्चाप्रसंगी त्यांना आसूड देताना भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश गुरखुदे, वैभव वैद्य व द्वारकधीश मित्र मंडळ. मोर्चेकर्यांसाठी मंडळाच्या वतीने पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
Leave a comment