माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस
रोषणपुरी बंधारा 90 टक्के भरला
माजलगाव । वार्ताहर
तालुक्यात रविवारी सायंकाळी पाच वाजेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने सिंदफना नदी दुथडी भरून वाहू लागली होती.सिंदफना नदीवरील रोषणपुरी येथील बंधारा 90 टक्के भरला असू रात्रभर पाऊस राहिल्यास हा बंधारा 100 टक्के भरण्याचा अंदाज आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात रविवारी सायंकाळी दुपारी 5 वाजल्यापासून नागडगाव, चिंचोली, मनूर, ढेपेगाव, लुखेगाव,पातरुड या गावात जोरदार पाऊस झाला.या पावसाने सिंदफना नदी दुथडी भरून वाहत आहे. रोशनपुरी येथील बंधारा आज रात्रीच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.शहरातही रात्री 8 वाजेपासून जोरदार पाऊस सुरू होता. तालुक्यातील लोणगाव,उमरी ,वाघोरा परिसरात तसेच गोदा काठी देखील जोरदार पाऊस झाला.
वडवणीसह डोंगरकिन्हीत पाऊस
रविवारी सायंकाळी बीड शहर व परिसरात पाऊस झाला. तसेच याच दरम्यान वडवणी परिसरासह तालुक्यात काही गावात सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. रात्रीपर्यंत पावसाची रिमझिम सुरु होती. दरम्यान पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही परिसरातही रविवारी समाधानकारक पाऊस झाला.
बीड परिसरात पावसाची दमदार हजेरी
खरीपांच्या पिकांना मिळणार जीवदान
बीड । वार्ताहर
बीड शहर व तालुक्यातील काही गावांमध्ये शनिवार ते रविवार असा सलग दोन दिवस पाऊस झाला. या पावसामुळे कमी पावसावर पेरा केलेल्या खरीपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बीड परिसरात शनिवारी सायंकाळी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. तसेच कुर्ला, शिदोड, भाटसांगवी, बहीरवाडी, नागापूर या परिसरातही पाऊस झाला. त्यानंतर रविवारीही चांगला पाऊस झाला. बीडमध्ये रात्री उशिरापर्यंत झिमझिम सुरु राहिली.
बीड परिसरात गत दोन आठवड्यापूर्वी जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांची हुरहूर वाढलेली आहे. अशातच मोठ्या पावसाची गरज व्यक्त होत असताना बीड परिसरात शनिवार व रविवारी चांगला पाऊस झाला. या पावसाचा आता खरीपाच्या पीक वाढीला फायदा होणार असल्याने शेतकर्यात समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान बीड परिसरात काही ठिकाणी नांगरणी झालेली नाही, पुर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीत वाफसा न झाल्याने नांगरणीसह खरीपाच्या पेरण्याही लांबणीवर पडल्या आहेत. बीड परिसरात रविवारी सायंकाळी रिमझिम पाऊस सुरु झाला. नंतर पावसाचा वेग वाढला होता, या पावसामुळे वातावरणातही उष्णता वाढली होती.
आष्टीत रिमझिम पावसाने पिकांना जीवदान
आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यात शनिवारी व रविवारी झालेल्या रिमझिम पावसाने जीवदान मिळाले आहे.आष्टी तालुक्यात रोहिण्या नक्षत्रात पाऊस झाल्याने शेतकर्यांनी मूग,उडीद,बाजरी,कापूस, सोयाबीन ची पेरण्या केल्या होत्या.
रोहिण्या नंतर सुरू झालेल्या मृग नक्षत्रात फारसा पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतातुर झाला होता.त्यानंतर आद्रा नक्षत्रात पाऊस न झाल्याने पिके कोमजू लागले होते मात्र आता रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.तालुक्यातील सात ही महसूल मंडळात रिमझिम पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. अगोदर कमी पावसावर पेरण्या केलेल्या पिकासाठी हा पाऊस वरदान ठरणार आहे.
Leave a comment