उध्दवजी केवळ जनतेवरच नियमांचे बंधन कशासाठी
जयंत पाटील यांच्या दौर्यात
कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; कोरोना नियमांचा फज्जा
बीड । वार्ताहर
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. अजुनही जिल्ह्याचा मृत्यूदर कमी झालेला नाही. गेल्याच आठवड्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी मृत्यूदर कसा कमी होत नाही? असा सवाल आरोग्य प्रशासनाला केला होता. रुग्णसंख्या कमी झालेली वाटत असली तरी धोका कायम आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एकदम निर्बंध शिथील करु नका अशा सूचना जिल्हाधिकार्यांना करत आहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे, डेल्टा पल्स व्हेरियंटचा धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करत आहेत. त्यातच राष्ट्रवादीचे मंत्री आता मोठंमोठे कार्यक्रम घेवून गर्दी करुन कोरोनाच्या तिसर्या लाटेलाच निमंत्रण देत असल्याचे चित्र राज्यात आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळीही तुफान गर्दी झाली होती. बीड दौर्यातही अजित पवारांच्या बैठकीदरम्यान मोठी गर्दी झाली होती. जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे ‘परिवार संवाद यात्रे’निमित्त मराठवाड्यात फिरत आहेत. काल उस्मानाबादेत गर्दी पाहिल्यानंतर राष्ट्रवादीचेच मंत्री कोरोनाला निमंत्रण देत आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षण मोर्चा, ओबीसींचा राजकीय आरक्षणासाठीचा मोर्चा, आता शनिवारी होणारे भाजपाचे चक्काजाम या मधून देखील कोरोनाला निमंत्रण दिले जाणार आहे. मंत्री, लोकप्रतिनिधींना कोणतेच नियम नाहीत, मात्र सर्वसामान्य जनतेलाच नियम पाळावे लागत आहेत. उध्दवजी, नियम सर्वांना सारखे करा, तरच शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेत आहे हा संदेश राज्यातील जनतेत जाईल अशा भावना जनतेमधून व्यक्त होत आहेत.
ना कसलं भान, ना परिस्थितीची जाण; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजितदादांसमोरच तोबा गर्दी
कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून गतवर्षी पहिल्या लाटेत सर्वांनीच नियम पाळले. मात्र दुसर्या लाटेत मंत्री, लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांच्याकडून नियमांना आणि निर्बंधांना हरताळ फासल्याचे दिसत आहे. जिल्हा प्रशासन एकीकडे जमावबंदी आणि संचारबंदी लावते आणि अशातही राजकीय पक्षांचे मोर्चे निघतात, मग नियम फक्त व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेलाच आहेत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. वास्तविक पाहता, सरकारमध्ये जबाबदार पक्ष म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडेच पाहिले जाते, मात्र त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांकडून बेजबाबदारपणाचे वर्तन केले जात असल्याचे चित्र राज्यात आहे. पुण्यातल्या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी गर्दीबद्दल खंत व्यक्त केली. मात्र कार्यक्रमानंतर खंत व्यक्त करण्यात काय अर्थ आहे? तिकडे नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या उपस्थितीत ओबीसींच्या राजकीय आरक्षण बचावासाठी आंदोलन झाले. तेथेही प्रचंड गर्दी होती. अजित पवारांचा दौरा मराठवाड्यात झाला. औरंगाबाद सोडले तर जालना, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूरला देखील चांगलीच गर्दी झाली होती. काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांचा देखील बीड जिल्हा दौरा झाला. त्यावेळी देखील शासकीय विश्रामगृहात पाय ठेवायला जागा नव्हती. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे देखील बीड जिल्हा दौर्यावर आले होते, त्यावेळीही नियमांना हरताळच फासण्यात आला. आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेनिमित्त मराठवाड्यात फिरत आहेत. तुळजाभवानीचे दर्शन घेवून त्यांनी यात्रा सुरु केली. मंदिर बंद असताना मंत्र्यांना दर्शन मिळाले कसे? हा ही प्रश्नच आहे. यावेळी मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने कोरोना नियमांचा पुरता फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी मास्क देखील घातले नव्हते. त्याचबरोबर, सोशल डिस्टन्ससिंगचे पालन देखील करण्यात आले नाही.
राष्ट्रवादी परिवार संवाद . तुळजापूर आणि उमरगा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्ष बांधणीच्या अनुषंगाने विधानसभा मतदार संघ, शहरनिहाय बैठका घेऊन जिल्हा कार्यकारिणी व अन्य महत्वाच्या पदाधिकारी बैठक घेणार आहेत यामुळे पक्षला बळ मिळणार आहे. 24 जून रोजी उस्मानाबाद , 25 जून लातूर येथे घेणार बैठक घेणार आहेत.या परिवार संवाद यात्रेत जयंत पाटील लातूर,नांदेड, यवतमाळ, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात बैठक घेणार आहेत. एकीकडे मंत्री गर्दी करुन फिरत आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता आणि व्यापार्यांना वेठीस धरले जात आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाया केल्या जात आहेत. नियम फक्त सर्वसामान्य जनतेलाच का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कालच राज्यातील जिल्हाधिकार्यांना निर्बंध एकदम उठवू नका असे निर्देश दिले आहेत, मग राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना निर्बंध नाहीत का? असा सवालही केला जात आहे. दौर्यानिमित्त गर्दीमध्ये कार्यक्रम घेणारे राष्ट्रवादीचे मंत्री कोरोनाच्या तिसर्या लाटेला निमंत्रण देत असल्याची भावना मराठवाड्यात निर्माण झाली आहे. मंत्र्यांनी ऑनलाईन दौरे करावेत, अशीही मागणी पुढे आली आहे.
तुळजापूरच्या भवानी मातेचे दर्शन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून यात्रेचा प्रारंभ
मंदिर बंद असताना दर्शन कसे?
राज्यातील सर्वच मंदिरे बंद आहेत. वारकर्यांसाठी पंढरपुरात संचारबंदी लावली, मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तुळजापूरात भवानी मातेचे मंदिरात जावून दर्शन घेतले. मंदिर बंद असताना त्यांना दर्शन मिळालेच कसे? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे. पर्यटन स्थळ खुले केले,मात्र मंदिरे बंद आहेत. सरकारच्या बौध्दीक दिवाळखोरीचे दर्शन या माध्यमातून होत आहे.
Leave a comment