पंकजा मुंडेंचे भाजपच्या ऑनलाईन बैठकीत आवाहन
बीड । वार्ताहर
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवले आहे. सरकारच्या या नाकर्तेपणाच्या विरोधात येत्या 26 जून रोजी भाजपच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘चक्का जाम’ आंदोलनात ओबीसी बांधवांनी मोठया संख्येने सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केले आहे.
‘चक्का जाम’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंकजाताई मुंडे यांनी आज भाजपच्या जिल्हा पदाधिकार्यांची ऑनलाईन बैठक घेऊन आंदोलनाच्या नियोजनाचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हयाच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, आ. सुरेश धस, आ. लक्ष्मण पवार, आ. नमिता मुंदडा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आमदार भीमसेन धोंडे, आर टी देशमुख, रमेश आडसकर, मोहन जगताप, अक्षय मुंदडा, प्रवक्ते राम कुलकर्णी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, ओबीसी मोर्चाचे डॉ. लक्ष्मण जाधव आदी यावेळी उपस्थित होते.ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे हे दुर्दैवी आहे. केवळ राज्य सरकारच्या वेळकाढूपणा व नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे. आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवावे लागेल. सरकारचा धिक्कार करण्यासाठी आणि आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका होऊ देणार नाहीत हा नारा घेऊन आपण 26 जूनच्या रास्ता रोको आंदोलनात ताकदीनिशी उतरायचे आहे. आतापर्यंत वेगवेगळी आंदोलने आपण यशस्वी केली आहेत, हे आंदोलनही यशस्वी करायचे आहे.प्रत्येक लोकप्रतिनिधींनी पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी बांधवांसह आंदोलनात सहभाग घेऊन जिल्हा दणाणून सोडावा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले.खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यावेळी बोलताना म्हणाल्या, मी स्वतः आंदोलना वेळी जिल्हयात असणार आहे. आंदोलनात मोठया ताकदीने उतरायचे आहे, त्यासाठी नियोजन करावे असे आवाहन केले. बैठकीचे प्रास्ताविक राजेंद्र मस्के यांनी केले. संचलन शंकर देशमुख यांनी केले तर देविदास नागरगोजे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी तसेच ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Leave a comment